
श्राद्धासाठी जाताना गंगा नदीत बोट उलटल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांना वाचवण्यात यश आले असून सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाजीपूर येथे रामपूर श्यामचंद गावाजवळ मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मृतांमध्ये 13 लहान मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली. प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले.
सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. बोटीत 20 हून अधिक जण होते. श्राद्ध कार्यक्रमासाठी सर्व जण बोटीतून पलिकडे जात होते. यावेळी बोट अचानक उलटली. बोट दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. लहान मुलांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

























































