प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरिफ शेखवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका नराधमाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका तरुणीने केल्यानंतर या आरोपीसह त्याची आई व अन्य एका नातेवाईकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने तब्बल 80 तरुणींना फसवल्याचा दावाही या पीडित तरुणीने केला आहे. आरिफ शेख असे या आरोपीचे नाव असून तो अवघा 22 वर्षांचा आहे. नालासोपाऱ्यातील एका तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार जीममध्ये ही तरुणी मित्रांसोबत गेली असताना तिची ओळख आरिफ शेख याच्याबरोबर झाली.

त्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत व पुढे प्रेमात झाले. आरिफ याने लग्नाचे आश्वासन देऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. आपली फसवणूक झाल्याचे समजताच तिने थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर आरिफ शेख त्याची आई रुक्साना व नातेवाईक साहील खान यांच्याविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी केली जात असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

व्हिडीओ इंटरनॅशनल पॉर्न साईटवर विकायचा

80 हून अधिक तरुणींवर लैंगिक अत्याचार करणारा आरिफ शेख हा व्हिडीओ काढायचा आणि इंटरनॅशनल पॉर्न साईटवर भरभक्कम रक्कम घेऊन विकायचा असा दावा पीडित तरुणीने केला आहे. पोलिसांनीही आरोपीच्या मोबाईलमध्ये आक्षेर्पाह व्हिडीओ सापडल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. तपास पूर्ण झाल्यानंतरच खरी बाब उघडकीस येणार आहे. त्यादृष्टीने पोलीस सखोल तपास करीत आहेत.