रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगाराइतका बोनस मिळणार, जाणून घ्या खात्यात किती पैसे होणार जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा केली आहे. आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने ७८ दिवसांच्या पगाराइतक्या बोनसला मंजुरी दिली आहे. सरकारने देशातील सर्व नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (PLB) जाहीर केला आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सायंकाळी ४ वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, दिवाळीची भेट म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका बोनस दिला जातो. या बोनसची गणना ७,००० रुपये किमान वेतनाच्या आधारावर केली जाते. या हिशोबानुसार कर्मचाऱ्यांना १७,९५१ रुपये दिले जातात. किमान वेतनाची ही मर्यादा २०१४-१५ सालापासून बदलण्यात आलेली नाही, ज्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनसची रक्कमही गेल्या ११ वर्षांपासून वाढलेली नाही.