संपूर्ण पिढीला घाबरवण्याचा आणि गप्प करण्याचा प्रयत्न; CJP नेत्यांच्या अटकेवरून ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जंतरमंतर येथे विनापरवानगी घुसल्याच्या आरोपावरून सीजेपी पक्षाचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईवरून आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध करत, “हा संपूर्ण पिढीला घाबरवण्याचा आणि गप्प करण्याचा प्रयत्न आहे,” असा घणाघात केला आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सरकारच्या या कृतीला भ्याडपणा म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी X वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, “आपल्या लोकशाही अधिकारांसाठी आपण आणि आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांनी मोठा लढा दिला आहे आणि आपल्याला तो सुरूच ठेवावा लागेल. सीजेपी नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अटकेचा मी तीव्र निषेध करते. आपल्या महान लोकशाही व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची हीच ती वेळ आहे.”

“ही कारवाई म्हणजे एका संपूर्ण पिढीला घाबरवण्याचा आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, जो आम्हाला अजिबात मान्य नाही. आपण आपल्या घटनात्मक अधिकारांशी कधीही तडजोड करू नये,” असेही त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारवर टीका करताना त्या पुढे म्हणाल्या, “देशाच्या अनेक भागांमध्ये लोकशाहीची हत्या होत आहे. सध्या बंगालमधील आमचे १४ हजार लोक पोलिस आणि राजकीय अत्याचाराचा सामना करत आहेत. जे सरकार हे विसरते की लोकशाही ही लोकांची, लोकांनी आणि लोकांसाठी असते, त्या सरकारचा अंत आता जवळ आला आहे.”

देशातील तरुणांना आवाहन करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी लाखो तरुणांना हे सांगू इच्छिते की, तुमची दीदी आजही आणि भविष्यातही नेहमीच तुमच्या पाठीशी आहे! चला, आपण सर्व मिळून आपल्या भारतमातेला वाचवूया.”