
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियन सैन्यात सहभागी झालेल्या हिंदुस्थानींबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, रशियन सैन्यात एकूण २६७ हिंदुस्थानी नागरिक सहभागी झाले होते. यापैकी ५१ हिंदुस्थानींचा मृत्यू झाला असून, ७७ हिंदुस्थानी अद्याप बेपत्ता आहेत.
काय आहे प्रकरण?
सर्वोच्च न्यायालयात दिव्या विरुद्ध हिंदुस्थानी संघ या खटल्याची सुनावणी सुरू होती. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर परराष्ट्र मंत्रालयाने रशियन सैन्यात अडकलेल्या हिंदुस्थानींची सविस्तर आकडेवारी मांडली.
सरकारने दिलेली आकडेवारी आणि माहिती
- एकूण सहभागी: २६७ हिंदुस्थानी नागरिक रशियन सैन्यात भरती झाले होते.
- मृत्यू: या युद्धात आतापर्यंत ५१ हिंदुस्थानींना आपला जीव गमवावा लागला आहे.
- बेपत्ता: ७७ हिंदुस्थानी अद्याप बेपत्ता आहेत (यापैकी ७ जण बेपत्ता असल्याची अधिकृत पुष्टी रशियन अधिकाऱ्यांनी केली आहे).
मृतांचे मृतदेह आणि नुकसानभरपाईबाबत न्यायालयाची सूचना
सुनावणीदरम्यान, नुकसानभरपाई मिळवण्यात येणाऱ्या अडचणी, मृतांची डीएनए ओळख पटवणे आणि मृतदेह हिंदुस्थानात आणण्यास होणारा विलंब या मुद्द्यांवरही सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधले. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, हिंदुस्थानी दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून या प्रक्रियेचा पाठपुरावा करत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने परराष्ट्र मंत्रालयाला अशी सूचना केली की, त्यांनी प्रभावित हिंदुस्थानींच्या कुटुंबांना मदत आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आमंत्रित करणारी एक सार्वजनिक नोटीस जारी करण्याचा विचार करावा. तसेच मंत्रालय कुटुंबांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधत असल्याची दखल घेत न्यायालयाने अपेक्षा व्यक्त केली की, अधिकारी नुकसानभरपाईच्या दाव्यांमध्ये मृतांच्या कुटुंबीयांना पूर्ण मदत करतील.





























































