आता संपूर्ण देशच जंतरमंतर बनेल, सीजेपी नेत्यांच्या अटकेनंतर अभिनेते प्रकाश राज यांचा सरकारला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीजेपी नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर सडकून टीका केली आहे. “तुम्ही आंदोलनाची जागा बदलू शकता, आंदोलन रोखू शकता, पण तुम्ही या देशाचा आवाज दाबू शकत नाही. आता संपूर्ण देशच जंतरमंतर बनेल,” असा इशारा प्रकाश राज यांनी दिला आहे. प्रकाश राज यांनी आपल्या X अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.

प्रकाश राज यांनी या व्हिडीओमध्ये सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले आहे की, सौरव आणि आशुतोष यांनी केवळ राष्ट्रध्वज घेऊन जंतरमंतरवर आंदोलन केले, तर त्यांना थेट पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी कशी सुनावण्यात आली? सरकार इतके हताश का झाले आहे, असा सवालही त्यांनी केला. याव्यतिरिक्त त्यांनी असा आरोप केला आहे की दिल्लीत गुंड पाठवून आंदोलकांना विशेषतः महिला आंदोलकांना मारहाण आणि त्यांच्याशी गैरवर्तन केले जात आहे. मात्र अशा गुंडांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई किंवा गुन्हे दाखल का केले जात नाहीत, यावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

जंतरमंतरला अधिकृत आंदोलनाच्या ठिकाणांच्या यादीतून वगळण्याच्या सरकारच्या निर्णयावरही प्रकाश राज यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारने आंदोलनासाठी आता रामलीला मैदानाची जागा दिली आहे, ज्यासाठी ५०,००० रुपये शुल्क आणि ५०,००० रुपये अनामत रक्कम भरावी लागते. यावर संताप व्यक्त करत ते म्हणाले की, या देशात आता प्रश्न विचारण्यासाठीही पैसे मोजावे लागतात, ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. “मग तुम्ही आंदोलनाची जागा अंदमान-निकोबार, एखाद्या वाळवंटात किंवा हिमालयाच्या शिखरावर का नाही हलवत? तिथे जाऊन आंदोलन करा असे सांगा ना,” असे ते म्हणाले.