मुस्कान-साहिलला फाशीची शिक्षा; पतीची हत्या करून निळय़ा ड्रममध्ये भरले होते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रियकरासोबत मिळून पती सौरभ राजपूतची हत्या करणाऱ्या मुस्कानला मेरठ कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. मुस्कानचा प्रियकर साहिललाही कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पतीची हत्या करून त्याचे तुकडे एका निळय़ा ड्रममध्ये भरले होते. हे प्रकरण संपूर्ण देशभर गाजले होते. अखेर दोन्ही आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

3 मार्च 2025 रोजी सौरभ राजपूतची हत्या करण्यात आली होती. त्याच्या मृतदेहाचा पाच तुकडे करून ते निळय़ा ड्रममध्ये भरण्यात आले होते. या प्रकरणात दोषी आढळलेल्या मुस्कान आणि साहिलला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. साहिल आणि मुस्कान यांना फाशीच्या शिक्षेसोबत 20,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शिक्षा सुनावल्यानंतर मुस्कान आणि साहिल दोघेही भावुक झाले आणि त्यांना हुंदके देऊन रडू कोसळले. शिक्षा सुनावण्यापूर्वी तुरुंगात असलेल्या मुस्कानला आणि साहिलला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडण्यात आले. कोर्टाने शिक्षा सुनावताच मुस्कान रस्तोगी आणि साहिलला अश्रू अनावर झाले. तर सौरभच्या आईने म्हटले मला न्याय मिळाला. आम्हाला न्याय मिळेल अशी आशा होती, असे सौरभचा भाऊ बबलू यांनी सांगितले.