कॉक्रोचचे उद्या दिल्लीत आंदोलन; लेहरा दो तिरंगा! देशातील प्रत्येक शहरातही निघणार मार्च, दीपकेंची घोषणा… मला जेलमध्ये टाकतील, पर्वा नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांची आंदोलने चिरडणाऱ्या व त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या मोदी सरकारविरोधात कॉक्रोच जनता पार्टी अधिकच आक्रमक झाली आहे. सरकारच्या दडपशाहीविरोधात सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी ‘लेहरा दो तिरंगा’ आंदोलनाची घोषणा केली आहे. शुक्रवार 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीत हे आंदोलन होणार आहे. सीजेपीच्या सर्व समर्थकांनी आपापल्या शहरात तिरंगा मार्च काढावा, असे आवाहनही दीपके यांनी केले आहे.

सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावरील कारवाईचा व्हिडीओ आज सोशल मीडियात शेअर करत दीपके यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि ‘लेहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनानंतर कदाचित मलाही जेलमध्ये टाकले जाईल. पण मला पर्वा नाही. मी तिरंगा फडकवणारच, असे दीपके यांनी सांगितले.

जंतर मंतरवर गेल्याने रांका, दास यांना तिहार तुरुंगात डांबले

जंतर मंतरवर तिरंगा फडकावल्या प्रकरणी सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक करण्यात आली असून त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

तिरंगा फडकावणे हा गुन्हा नाही!

‘‘सीजेपीच्या सर्व पाठीराख्यांनी 16 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये जमावे. ज्यांना दिल्लीत येणे शक्य नसेल त्यांनी आपापल्या शहरात तिरंगा मार्च काढावा. तिरंगा हा आमचा अभिमान आहे. तिरंगा फडकावणे हा गुन्हा नाही हे हुकूमशहांना ठणकावून सांगा, असेही दीपके यांनी सांगितले.