
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीवर पडलेल्या दरोडय़ामुळे देशभरात संताप असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातील देवळातही चोर शिरल्याचे समोर आले आहे. कोटय़वधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसा वरील सोने गायब झाले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनाने तातडीने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
वाराणसीच्या तेलियाबाग येथील रहिवासी ऍड. नित्यानंद राय यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालयाला पत्राद्वारे तक्रार केली आहे. मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या वरच्या भागातील दोन सुवर्ण कलश गायब आहेत, तर कळसाच्या इतर छोटय़ा-छोटय़ा भागातील सोने नखलून नखलून नेले जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मंदिर व्यवस्थापन म्हणते, माकडांनी कलश पाडला!
मंदिर व्यवस्थापनाने चोरीचे आरोप फेटाळले आहेत. मंदिर परिसरात माकडांचा वावर असून त्यांच्या उडय़ांमुळे उत्तर द्वारावरील एक सुवर्ण कलश खाली पडला होता. तो विश्वनाथ धाम येथे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. तांत्रिक तपासणीनंतरच तो पुन्हा चढवला जाणार आहे. त्यासाठी आयआयटी मद्रासशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्या टीमने प्राथमिक पाहणी केली असून संपूर्ण कळसाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला आहे, असे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले.



























































