
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या खटल्याची सुनावणी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी होऊ शकली नाही. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठापुढे शिवसेनेचा खटला प्रलंबित आहे. खंडपीठाच्या सदस्य असलेल्या न्यायमूर्ती व्ही. मोहना यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या गैरहजर होत्या. त्यामुळे शिवसेनेची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता 26 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गद्दार शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठापुढे अंतिम सुनावणी सुरू आहे.
साडेतीन वर्षे खटला रखडला
मागील जवळपास साडेतीन वर्षे रखडलेल्या या खटल्यात गेल्या महिन्यापासून सुनावणीला गती मिळाली आहे. शिंदे गटाचा पक्षचिन्हासंबंधी युक्तिवाद पूर्ण झाला असून आता गद्दार आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दय़ावर बाजू मांडण्यात येणार आहे. तथापि, मंगळवारप्रमाणे बुधवारीही न्यायमूर्ती मोहना यांना प्रकृती ठीक नसल्यामुळे न्यायालयात हजर राहता आले नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेची सुनावणी होऊ शकली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरील नोंदीनुसार 26 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या खटल्याकडे महाराष्ट्रातील जनतेसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



























































