
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची आज पुन्हा एसआयटीच्या पथकाने आठ तास कसून चौकशी केली.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांनी रचल्याचा पूर्णेकर कुटुंबाचा आरोप आहे. प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांच्या जबाबानुसार पुरवणी एफआयआरमध्ये या दोघांच्या नावांचा उल्लेख पोलिसांनी केला आहे. हत्येनंतर 14 दिवसांनी मंगळवारी याप्रकरणी राजेंद्र शिंदे चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झाले. त्यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज सलग दुसऱया दिवशी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. एसआयटीने दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत त्यांची चौकशी केली.
पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी याबाबत माहिती दिली. या गुह्यातील तपासादरम्यान मिळणारे पुरावे व तपशिलाच्या आधारे संबंधित अन्य व्यक्तींचीदेखील चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अधिक तपशील त्यांनी दिला नाही.
पूर्णेकर हत्याकांड प्रकरण नितेश पवार, निखिल यादव न्यायालयीन कोठडीत
पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी नितेश पवार आणि निखिल यादव या दोघांची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमितसिंह ऊर्फ पपलू हे अन्य दोन आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
सदावर्ते यांनी केली एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी
पुरवणी जबाबात नाव नोंदवूनही पोलिसांनी मीनाक्षी शिंदे व त्यांच्या पतीला आरोपी का केले नाही, असा सवाल आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना केला. ठाण्यातील क्लस्टर हा उपमुख्यमंत्री आणि जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या क्लस्टरमुळेच निष्पाप पूर्णेकर यांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर पालकमंत्री म्हणून शिंदे यांनी साधा सांत्वनाचा पह्नही पूर्णेकर कुटुंबाला केला नाही. राजकीय दबावामुळेच तपास संथगतीने सुरू आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर शिंदे यांनी पदावर राहू नये. राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.






























































