
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी महिला कर्मचाऱयांना लवकरच 180 दिवसांची भरपगारी प्रसूती रजा मिळणार आहे. याबाबत लवकरच परिपत्रक काढून कार्यवाही केली जाईल, अशी माहिती आज महापौर रितू तावडे यांनी दिली. शिवाय या कर्मचाऱयांच्या वेतन विलंब प्रकरणी पंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि तक्रार निवारणासाठी समिती गठीत करण्यात येईल, असेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत 1700हून अधिक कंत्राटी आरोग्य कर्मचाऱयांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महापौर रितू तावडे यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक झाली. बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱयांचे विविध मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. महापौर रितू तावडे यांनी आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. कोविड-19 संसर्गाच्या संकटकाळात मुंबईकरांची सेवा करणाऱया या कर्मचाऱयांच्या मागण्या तातडीने निकाली निघाव्यात, यासाठी महापौर तावडे यांनी प्रशासनाला पत्र लिहून ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार सार्वजनिक आरोग्य खात्याकडून महापौर रितू तावडे यांना सविस्तर अहवाल सादर करण्यात आला.






























































