सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेला अभिनेता इमरान खानला देश सोडण्याचे आदेश, मुंबई पोलिसांनी नोंदवला गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीसह देशभर आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनात राजकारण्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकाने सहभाग घेतला. अमीर खानचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इमरान खान हा देखील मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी झाला होता. विनापरवानगी आयोजित केलेल्या या आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी इमरान खान यांच्यासह 400 हून अधिक जणांवर गुन्हा (FIR) नोंदवला असून इमरान खानला देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार यादीतील फेरफाराविरोधात मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या आंदोलनात इमरान खान सहभागी झाला होता. या आंदोलनात इमरान खानसोबत अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन तसेच त्याची चुलत बहीण झैन मेरी खान हे दोघेही सहभागी झाले होते. विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी या तिघांनाही घटनास्थळीच ताब्यात घेतले होते. पोलीस व्हॅनमधून जाताना त्यांनी सोशल मीडियावर एक सेल्फी शेअर केला होता.

दरम्यान आता मुंबई पोलिसांनी इमरान खान याला नोटीस बजावली असून, त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याचे निर्देश दिले आहेत. परदेशी नागरिक असूनही हिंदुस्थानातील राजकीय आंदोलनांमध्ये सहभाग घेतल्यामुळे इमिग्रेशन कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.