अभिनेता इमरान खानला देश सोडण्याचे आदेश; ‘हे सरकार घाबरलेलं आहे’, संजय राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसआयआर, निवडणूक आयोगाचा भ्रष्ट कारभार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजही सहभागी झाले. अभिनेता इमरान खान हा देखील या आंदोलनात सहभागी झाला होता. या प्रकरणी आता त्याला नोटीस बजावण्यात आली असून देश सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. एसआयआरविरुद्ध आणि तरुणांच्या बाजुने आंदोलन केले म्हणून देश सोडा असे सांगितले जात असेल तर हे सरकार घाबरलेले आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

इमरान खान याला देश सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांचे सरकारच हे करू शकते. तसे असेल तर मग बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जायला का नाही सांगत. अक्षय कुमार याच्यासह बॉलीवूडमधील अनेक कलाकारा एनआयआर किंवा विदेशी नागरीक आहेत. पण इमरान खान याने एसआयआरविरुद्धच्या आंदोलनात सहभाग घेतला आणि तरुणांच्या बाजुने आवाज उठवला म्हणून त्याला देश सोडा असे सांगत असाल तर हे सरकार घाबरलेले आहे.

सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेला अभिनेता इमरान खानला देश सोडण्याचे आदेश, मुंबई पोलिसांनी नोंदवला गुन्हा

2029 ला पुन्हा आमचे सरकार निवडून येईल असे म्हणणाऱ्या अमित शहा यांचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. हे ते स्वत: बोलत नाही, तर ज्ञानेश कुमार त्यांच्या तोंडातून बोलत आहेत. पण ज्ञानेश कुमार तर जातील, मोदी-शहाही जातील. मार्च-एप्रिलपर्यंत या देशातील घडामोडी शिखरावर गेलेल्या असतील आणि मोठे बदल होताना दिसतील, असेही संजय राऊत म्हणाले.

काशी विश्वनाथ मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला झाल्याचे वृत्त आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, तिकडले खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. एकेकाळी मोघलांनी हिंदू मंदिरांवरील सोन्याचे कळस कापून नेले होते. सोमनाथ मंदिरही 17 वेळा लुटले होते. आता नरेंद्र मोदी यांच्या काळात त्यांचेच लोक राम मंदिराची दानपेटी लुटत आहेत आणि काशीच्या मंदिरावरील सोन्याचा कळस सुद्धा चोरून नेत आहेत.

दरम्यान, आरएसएसच्या विजया दशमी कार्यक्रमासाठी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, जगदीप धनखड यांना मोदी-शहा यांनीच उपराष्ट्रपतीपदावरून हाकलून दिले होते. त्यांना तडकाफडकी काढण्याचे काम मोदी-शहांनी केले होते. आता यामधील पेच समजून घ्या. आरएसएसने धनखड यांना बोलावले आहे. आरएसएस आणि मोदी-शहांमध्ये फार मोठी दरी निर्माण झाली आहे. आरएसएसला मोदी-शहांना दूर करायचे आहे याचा हा पुरावा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.