पाकिस्तानात शाळेचे छत कोसळले; 17 विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेचा मृत्यू, 40 हून अधिक विद्यार्थी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरमध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील एका खासगी शाळेचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानसार, ही दुर्दैवी घटना शहरातील अंतर्गत भागातील ‘दीर कॉलनी’ (Dir Colony) परिसरातील एका खासगी शाळेत घडली. शाळेचे छत अचानक कोसळल्याने वर्गामध्ये बसलेले विद्यार्थी आणि शिक्षक ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत 17 विद्यार्थी आणि एक महिला शिक्षिका यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पालकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.