
शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अभिनेता इम्रान खान यांना हिंदुस्थान सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याचा दावा शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत, देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे. जंतरमंतरवरील आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावरील कारवाईचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.
So just like @SauravDassss and @AshutoshRanka were sent to jail by the regime for holding a 🇮🇳 in their hand and waving it at Jantar Mantar- in our own country,
Apparently, Imran Khan, the actor holding an OCI, has been sent a notice by the regime to leave India.
His crime: going to August Kranti Maidan, while the regime brutally picked up citizens, at a peaceful protest called by the great- grandson of Mahatma Gandhi- @TusharG ji.
The protest was peacefully asking the election commission to come clean on vote theft and election rigging.
Basically, under this regime, unlike under any other real democratic government around the free world, even holding your national flag, or simply being present at a peaceful demonstration asking for accountability is a crime worth jail!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 15, 2026
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या प्रकरणावर भाष्य केले. त्यांच्या दाव्यानुसार, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारक असलेल्या अभिनेता इम्रान खान यांना हिंदुस्थान सोडण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या आवाहनावर ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करण्यात आले होते. निवडणुकीतील कथित मतचोरी आणि गैरप्रकारांबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली होती. या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
जंतरमंतर येथे भारतीय तिरंगा हातात घेऊन फडकवल्यामुळे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. देशात लोकशाही मार्गाने आंदोलन करणे, राष्ट्रध्वज हातात घेणे आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे यासाठी नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागत असल्याची टीका त्यांनी केली. ‘जगातील लोकशाही देशांमध्ये नागरिकांना शांततापूर्ण आंदोलनातून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. मात्र, सध्याच्या सरकारच्या काळात राष्ट्रध्वज हातात घेणे किंवा आंदोलनात सहभागी होणे हेदेखील तुरुंगवासास पात्र ठरणारे कृत्य मानले जात आहे,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.


























































