
ब्रिगेडियर हेमंत महाजन
भारतीय सैन्याने ऑपरेशन फायरवॉलद्वारे पाकिस्तानच्या अनेक हस्तकांचा पर्दाफाश करून त्यांना अटक केली आहे. तरीही शत्रूसाठी काम करणाऱ्या हेरांची संख्या कमी न होणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही हेरगिरी कायमची थांबवणे हे आपल्या सुरक्षेपुढील एक मुख्य आव्हान आहे.
पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांकडून भारताविरुद्ध विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. सैन्याची तैनाती, शस्त्रास्त्रांची माहिती, वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख, लष्करी तळांची संवेदनशील माहिती, नौदलाच्या हालचाली आणि संरक्षणविषयक तांत्रिक तपशील मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी पारंपरिक मानवी गुप्तचर यंत्रणांबरोबरच सोशल मीडिया, बनावट डिजिटल ओळखी, आर्थिक प्रलोभने आणि भावनिक संबंधांचा वापर केला जातो. यासंदर्भात ‘हनी ट्रप’ ही पद्धत चिंतेची आहे. एखाद्या व्यक्तीशी प्रेमसंबंध किंवा जवळीक निर्माण करून, त्याचा विश्वास संपादन करून आणि नंतर त्याच्याकडून गोपनीय माहिती मिळविणे हा या पद्धतीचा मुख्य उद्देश असतो. काही प्रकरणांत भावनिक दबाव, आर्थिक आमिष किंवा खासगी छायाचित्रे आणि संदेश सार्वजनिक करण्याची धमकी देऊन संबंधित व्यक्तीला माहिती पुरविण्यास भाग पाडले जाऊ शकते.
आजच्या डिजिटल युगात गुप्तहेराला लष्करी तळात प्रत्यक्ष प्रवेश मिळविण्याची आवश्यकता नसते. एखाद्या जवानाने सोशल मीडियावर शेअर केलेले छायाचित्र, एखाद्या अधिकाऱयाने अनावधानाने सांगितलेली पोस्टिंगची माहिती किंवा एखाद्या कंत्राटी कर्मचाऱ्याने पाठविलेला दस्तऐवजदेखील व्यापक गुप्तचर विश्लेषणासाठी उपयुक्त ठरू शकतो. अनेक छोटय़ा माहितीच्या तुकड्यांची सांगड घालून शत्रूला मोठे चित्र समजू शकते. मात्र या विषयाचे विश्लेषण करताना किती जणांना अटक झाली यावरून शत्रूने किती महत्त्वाची माहिती मिळविली, हेही निश्चित करता येत नाही.
राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण केवळ शस्त्रास्त्रs आणि सीमांच्या रक्षणावर अवलंबून नसते तर ते प्रत्येक सैनिकाच्या जागरूकतेवर, डिजिटल शिस्तीवर आणि संस्थात्मक प्रतिगुप्तचर व्यवस्थेवरही अवलंबून असते.
हनी ट्रॅप ही केवळ प्रेमसंबंधांची फसवणूक नसून मानवी गुप्तचर संकलनाची एक पद्धत आहे.
पहिला टप्पा – संपर्क आणि बनावट ओळख ः सोशल मीडियावर एखादी व्यक्ती आकर्षक छायाचित्रे, बनावट नाव किंवा विश्वासार्ह वाटणारी व्यावसायिक ओळख वापरून लष्करी कर्मचाऱ्याशी संपर्क साधते. ती स्वतःला विद्यार्थी, पत्रकार, व्यावसायिक किंवा संभाव्य मैत्रीण म्हणून सादर करू शकते.
दुसरा टप्पा – भावनिक जवळीक निर्माण करणे ः नियमित संदेश, वैयक्तिक संवाद आणि सहानुभूतीच्या माध्यमातून विश्वास संपादन केला जातो. व्यक्तीला हा संपर्क पूर्णपणे सामान्य आणि खासगी स्वरूपाचा वाटू शकतो. त्यामुळे सुरुवातीला सुरक्षेचा धोका लक्षात येत नाही.
तिसरा टप्पा – माहिती मिळविण्याचा प्रयत्न ः कामाचे स्वरूप, पोस्टिंग, सहकारी, प्रवास, छायाचित्रे आणि व्यावसायिक अनुभव यांबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्वतंत्रपणे पाहिल्यास ही माहिती किरकोळ वाटू शकते, परंतु तिची इतर माहितीशी सांगड घातल्यास ती संवेदनशील ठरू शकते.
चौथा टप्पा – प्रलोभन किंवा ब्लॅकमेल ः काही प्रकरणांत आर्थिक आमिष दाखविले जाते. इतर प्रकरणांत खासगी संदेश किंवा छायाचित्रे सार्वजनिक करण्याची धमकी दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्ती भीतीमुळे माहिती पुरविणे सुरू ठेवू शकते.
पाचवा टप्पा – सातत्यपूर्ण माहिती संकलन ः संपर्क दीर्घकाळ टिकल्यास वारंवार माहिती मिळविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. संबंधित व्यक्तीला संपूर्ण उद्देश समजलेला नसतानाही तिच्या माध्यमातून इतर व्यक्तींपर्यंत संपर्क पोहोचविण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
या पद्धतीच्या प्रभावामागे मानवी भावना, हळूहळू वाढणारी गुंतवणूक, माहितीचे तुकडे एकत्र करण्याची क्षमता आणि डिजिटल पुरावे यांचा परस्पर संबंध असतो.
प्रतिबंधात्मक उपाय ः भारतीय सशस्त्र दलांनी काय करावे?
हनी ट्रप आणि इतर गुप्तचर प्रयत्नांना रोखण्यासाठी केवळ जनजागृती पुरेशी नाही. मानवी वर्तन, तांत्रिक सुरक्षा, माहितीवरील नियंत्रण आणि प्रभावी तपास यांचा एकत्रित वापर आवश्यक आहे.
सातत्यपूर्ण प्रशिक्षण ः भरतीच्या वेळी, प्रशिक्षण संस्थांमध्ये, पदोन्नती अभ्यासक्रमांत आणि संवेदनशील नियुक्त्यांपूर्वी हनी ट्रप, बनावट सोशल मीडिया खाती व डिजिटल ब्लॅकमेल याबाबत प्रशिक्षण दिले पाहिजे.
डिजिटल शिस्त ः जवानांनी पोस्टिंग, तैनाती, शस्त्रास्त्रs, लष्करी तळ, सहकारी किंवा संवेदनशील कामाशी संबंधित माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये. OTP, पासवर्ड आणि खाते पुनर्प्राप्ती संकेत कोणालाही सांगू नयेत. अधिकृत कामासाठी केवळ मान्यताप्राप्त डिजिटल साधनांचा वापर केला पाहिजे.
माहितीचे मर्यादित वितरण ः प्रत्येक कर्मचाऱयाला त्याच्या कामासाठी आवश्यक असलेलीच माहिती उपलब्ध करून द्यावी. संवेदनशील माहितीवरील प्रवेशाचे नियमित पुनरावलोकन केले पाहिजे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अनावश्यकपणे अनेक स्रोतांतील माहिती एकत्र करून संपूर्ण सामरिक चित्र तयार करता येणार नाही.
अंतर्गत धोक्यांची ओळख ः अधिकृत सुरक्षा पथकांनी संवेदनशील नोंदींना असामान्य प्रवेश, अनधिकृत डाऊनलोड किंवा संशयास्पद डिजिटल व्यवहार यांची योग्य मर्यादेत तपासणी करावी.
गोपनीय तक्रार व्यवस्था ः एखाद्या कर्मचाऱयाला संशयास्पद संपर्क झाल्याचे लक्षात आल्यास त्याला त्वरित कळविण्यासाठी विश्वासार्ह आणि गोपनीय यंत्रणा असावी. अनावधानाने माहिती दिल्याचे वेळेत मान्य करणाऱया व्यक्तीला आणि जाणीवपूर्वक हेरगिरी करणाऱया व्यक्तीला एकाच पद्धतीने हाताळता कामा नये.
पंत्राटदारांची सुरक्षा ः नौदल तळ, शिपयार्ड आणि संरक्षण उद्योगातील पंत्राटी कर्मचाऱयांसाठी त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार प्रवेश नियंत्रण, गोपनीयतेचे नियम आणि सुरक्षा प्रशिक्षण लागू असावे.
सायबर व प्रतिगुप्तचर समन्वय ः संशयास्पद संदेश, डिजिटल खात्यांचा गैरवापर, अनधिकृत आर्थिक व्यवहार आणि माहितीच्या गळतीची चौकशी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने करावी. माहिती गळती झाल्यास कोणती माहिती उघड झाली, तिचा गैरवापर झाला का आणि कोणते सुरक्षा बदल आवश्यक आहेत, याचे त्वरित मूल्यमापन करावे.
निष्कर्ष
पाकिस्तानशी संबंधित हेरगिरीच्या प्रकरणांनी भारतीय सशस्त्र दलांसमोर मानवी आणि डिजिटल सुरक्षेचे आव्हान अधोरेखित केले आहे. ऑपरेशन फायरवॉलसारख्या तपासांतून संशयित नेटवर्कची व्याप्ती शोधण्याचे महत्त्व स्पष्ट होते. मात्र दीर्घकालीन उपाय म्हणजे केवळ अटक किंवा चौकशी नव्हे, तर सातत्यपूर्ण प्रशिक्षण, काटेकोर डिजिटल शिस्त, मर्यादित माहितीप्रवेश, कंत्राटदारांची सुरक्षा आणि त्वरित तक्रार व्यवस्था हे आहेत.





























































