
सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून त्यात रायगड जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा समावेश आहे. मात्र अलिबाग, मुरबाड, रोहा, पेण व सुधागड हे पाच तालुके दुष्काळग्रस्त यादीबाहेर ठेवण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. लवकरात लवकर पाचही तालुक्यांमधील शेतीच्या परिस्थितीची पाहणी करून या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांची उपजीविका प्रामुख्याने भात, नाचणी आणि इतर खरीप पिकांवर अवलंबून आहे. यंदाच्या हंगामात जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाताची रोपे तयार करण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले. त्यानंतर पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. पिके तयार होण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाची गरज होती. पण पाऊस न आल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा फटका अलिबाग, मुरबाड, रोहा, पेण व सुधागड या तालुक्यांना बसला आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
शिवसेना रायगड लोकसभा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतिश पाटील, तालुकाप्रमुख शंकर गुरव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदनही दिले आहे.
तर आंदोलन करणार
पाच तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे रहावे व अलिबाग, मुरूड, रोहा, पेण व सुधागड या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्तांच्या यादीत करावा अन्यथा मोठे जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा संपर्कप्रमुख संजय कदम आणि जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी दिला आहे.




























































