
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या क्लस्टर योजनेला त्यांच्याच नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. आम्हाला विश्वासात न घेता क्लस्टर योजना राबवली जात असल्याचा आरोप करत शिंदे गटाचे नगरसेवक संजय भोईर यांनी या प्रोजेक्टमधून गावठाणे वगळली नाहीत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही तर मी राजीनामा देईन, असा इशारा दिला. दरम्यान क्लस्टर योजनेत गावठाणांचा समावेश करण्यावरून ठाणे पालिकेच्या या महासभेत आज खडाजंगी उडाली. नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
ठाणे पालिकेची महासभा गाजली
ठाणे महापालिका क्षेत्रातील अधिसूचित नागरी पुनरुत्थान आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट लिमिटेड’ ही स्वतंत्र विशेष कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेसमोर मांडला. प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी करण्यासाठी ही कंपनी कार्यरत राहणार असल्याची माहिती क्लस्टर सेलचे प्रमुख कुणाल मुळे यांनी यावेळी दिली. प्रकल्प आराखड्यात करण्यात आलेला गावठाणचा समावेश, जागेची उपलब्धता, पायाभूत सुविधांचे नियोजन आदी मुद्यांवरून शिंदे गटाचे नगरसेवक संजय भोईर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी गावठाणात क्लस्टर नकोच, असे नगरसेवक संजय भोईर आणि शिंदे गटाच्या नगरसेविका अनिता गौरी यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.
नगरसेवकांना विश्वासात घेऊनच अंमलबजावणी
गावठाण धोरणात बदल झालेला नसून स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल, असे यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. तसेच गावठाणांचा समावेश चुकून झाला असेल तर तो वगळण्यात येईल. स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल, असा विश्वास राव यांनी यावेळी व्यक्त केला.
नवी मुंबईतही कात्रजचा घाट, शिंदे गटाच्या लक्षवेधी भाजपने हाणून पाडल्या
महापालिकेच्या महासभेत भाजपने आज शिंदे गटाला पुन्हा कात्रजचा घाट दाखवला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि शिंदे गटाच्या नगरसेविका गौरी आंग्रे यांनी मांडलेल्या लक्षवेधी महापौर सुजाता पाटील यांनी पटलावर घेतल्याच नाहीत. त्यामुळे शिंदे गटाच्या नगरसेवकांचा एकच तिळपापड झाला.
महासभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर महापौर सुजाता पाटील प्रश्नोत्तरांचा तास सुरू केला. त्याचवेळी लक्षवेधीबाबत शिंदे गटाच्या नगरसेवकांनी नगर सचिव संघरत्ना खिलारे यांच्याकडे विचारणा केली. लक्षवेधीचा एक विषय रेल्वेच्या धरणाचा तर दुसरा आरोग्यासंदर्भात होता. हे विषय लक्षवेधीचे होत नसल्याचे नगर सचिवांनी जाहीर केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर महापौरांनी या दोन्ही लक्षवेधी चर्चेसाठी पटलावर घेतल्या नाहीत.
महापौरांची दमदाटी
नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू असताना मनसेचे अभिजित देसाई यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. त्यामुळे महापौर सुजाता पाटील संतापल्या. तुम्ही खाली बसा, नाही तर तुम्हला निलंबित करीन, अशी दमदाटी त्यांनी देसाई यांना केली.





























































