Lal Krishna Advani – लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (वय – 98) यांची तब्येत बिघडली आहे. अडवाणी यांना फुफ्फुसाच्या त्रासामुळे आणि छातीतील संसर्गामुळे दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.

लालकृष्ण अडवाणी यांना शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. अडवाणी यांच्या छातीमध्ये संसर्ग झाल्याची माहिती अपोलो रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन जारी करत दिली. सध्या अडवाणी यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली अडवाणी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.

अडवाणी यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी शनिवारी सकाळी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी एक आठवड्यांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

अडवाणी यांनी राजकारणात आणि भाजपच्या जडणघडणीत अनेक दशके अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशाचे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळण्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. 2002 ते 2004 या काळात ते देशाचे उपपंतप्रधान राहिले. यासह त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही पद भूषवले. अडणी हे चार वेळा राज्यसभेवर तर सात वेळा लोकसभेवर निवडून गेले.