
दिल्लीतील परीक्षितपूर येथे जन्मलेल्या संत सहजोबाई या संत चरणदास यांच्या शिष्या. सहजोबाई या योगसाधिका, कवी, विदुषी व भार्गव वंशातील गौरवशाली स्त्री संत होत्या. ‘हरीने जन्म दियो जग माही। गुरूने आवागमन छुटाही।।’ असे म्हणत ‘देव मी पाहिला नाही, पण गुरूला मी साक्षात पाहिले आहे. त्यामुळे देवापेक्षा माझी गुरूंवर श्रद्धा जास्त आहे,’ असे त्या आपले मत मांडतात. आपल्या मधुर वाणीतून त्या गावोगावी गुरूमहिमा गात असत. गुरूमहिमा गात त्यांनी दिल्लीवासियांना भक्तीचा वेगळा अध्याय सांगितला. त्यांच्या अभंगात अजपा गायत्रीचे अंग आणि जन्म-मरण अवस्था हे विषय विशेष करून दिसून येतात. जन्म-मृत्यू हे दोन बिंदू. या बिंदूतून प्रवास करताना आपण सरळ वागण्याच्या प्रयत्नात कधी वाकडे होत जातो, हे आपलेच आपल्याला कळत नाही. मग सरळ कसे व्हायचे, हे जीवनाचे तत्त्वज्ञान सहेजाबाईंना आपल्या ‘सहज प्रकाश’ या ग्रंथात सांगितले आहे.

























































