
>> डॉ. शिल्पा तिवसकर
भूलतज्ञ ही वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची शाखा. भूलतज्ञांचे महत्त्व सांगणारा हा छोटासा प्रसंग या क्षेत्रातील गांभीर्य, संयम आणि जबाबदारी अधोरेखीत करणारा आहे.
दुपारी 12:50 ची वेळ. मी अॅनेस्थेशियाच्या OPD मध्ये पेशंट बघत होते. गणपतीच्या सुट्ट्या संपल्यानंतरचा पेशंटचा लोंढा सुरू होता. एक मध्यमवयीन जोडपे समोर येऊन बसले. नवरा म्हणाला, “मॅडम, किती वेळ थांबायचे? लवकर काय ते ऑपरेशनसाठी आवश्यक असलेले फिटनेस सर्टिफिकेट द्या.”
मी एक पॉज घेतला. मी स्मित देत म्हणाले, “थकलात? वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटणे, त्यांचे Fitness घेणे, रक्ताच्या आणि बाकी तपासण्या करणे, सर्व रिपोर्ट गोळा करणे, ऑपरेशन थिएटरचे Booking करणे…” तसा जोडप्याचा शीण जरा कमी झाल्यासारखा वाटला आणि आमचा सुसंवाद सुरू झाला.
मी समजवायला सुरू केले, “हा एक साधा Fitness नाही की, घ्या आणि मोकळे व्हा. शस्त्रािढया सुरू असताना तुमच्या जीवनाशी निगडित असा हा Fitness आहे.
शस्त्रक्रियेच्या दरम्यान तुम्ही शुद्धीत नसता, किंबहुना जागे असलात तरी गुंगीत असता. त्यामुळे तुम्हाला काही समजत नाही. सर्जनचे संपूर्ण लक्ष शस्त्राक्रियेमध्ये असते. त्या वेळी तुमच्या जीवनाचे दोर अॅनेस्थेशियाच्या डॉक्टरांच्या हातात असतात, म्हणजेच भूलतज्ञाच्या.
प्री-अॅनेस्थेशिया चेकअप करून फिटनेस सर्टिफिकेट घेणे म्हणजे अॅनेस्थेशिया घेण्याआधी भूलतज्ञाची भेट घेणे, जे तुम्ही आता करत आहात. त्या वेळी तुम्ही जी मेडिकल हिस्ट्री – माहिती – देता स्वत:बद्दलची, ती आम्हाला शस्त्रक्रियेच्या दरम्यान तुम्हाला आणि तुमच्या महत्त्वाच्या क्रिया मॅनेज करायला उपयोगी पडते. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या आधी अॅनेस्थेशिया देणाऱ्या डॉक्टरांना आवर्जून भेटा. आपल्या सगळ्या आजारांची, औषधांची, व्यसनांची, अॅलर्जीची सर्व खरी खरी माहिती द्या. त्यांच्याकडून तुमचा तपाससुद्धा करून घ्या.
तुम्हाला कोणता अॅनेस्थेशिया (कोणत्या प्रकारची भूल) योग्य आहे समजून घ्या. तुमच्या शंकाकुशंका दूर करा!”
ते जोडपे खूष झाले, म्हणाले, ”चला, आपला अंगरक्षक भेटला!”
(लेखिका प्रसिद्ध भूलतज्ञ आहेत.)

























































