
>> भावेश ब्राह्मणकर
नाशिकमधील अंबड परिसरातील प्रदूषित झालेले भूजल ही अतिशय गंभीर घटना. मूग गिळून असलेल्या यंत्रणेचे वाभाडे यातून दिसत आहेत. विशेष म्हणजे, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी शुद्धीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कुंभमेळ्याच्या धामधुमीत अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या दत्तनगर, चुंचाळे, मारुती संकुल आणि तुळजाभवानी परिसरातील नागरिकांच्या घरांमधील बोअरवेलमधून पिवळसर, दुर्गंधीयुक्त पाणी येणे ही विकासाच्या दाव्यांना काळिमा फासणारी घटना आहे. या पाण्यात अत्यंत गंभीर प्रमाणात क्रोमियम आणि त्यातील हेक्साव्हॅलेंट क्रोमियम आढळले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या समस्येकडे दुर्लक्ष करण्याची मुभा कोणालाही नाही.
प्रश्न केवळ बोअरवेलमधून पिवळे पाणी येण्याचा नाही. प्रश्न आहे तो नाशिकच्या भूजलाचा, नागरिकांच्या आरोग्याचा, औद्योगिक व्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचा आणि पर्यावरण संरक्षणाच्या सरकारी यंत्रणेच्या विश्वासार्हतेचा! एका बाजूला पवित्र गोदावरीच्या शुद्धीकरणाच्या घोषणा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला औद्योगिक सांडपाण्यामुळे भूजल दूषित होत असल्याच्या तक्रारी समोर यायच्या, हा विरोधाभास अस्वस्थ करणारा आहे. कुंभमेळ्याच्या झगमगाटात स्थानिक नागरिकांच्या जगण्याचा मूलभूत प्रश्न झाकोळला जाणार असेल तर विकासाच्या संकल्पनेलाच आत्मपरीक्षणाची गरज आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या निवासी भागात बोअरवेलमधून पिवळसर आणि उग्र वासाचे पाणी येत असल्याच्या तक्रारींनंतर पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. उपलब्ध माहितीनुसार, एका मान्यताप्राप्त प्रयोगशाळेच्या अहवालात पाण्यात एकूण क्रोमियमचे प्रमाण 50.5 मिलिग्रॅम प्रतिलिटर, तर हेक्साव्हॅलेंट क्रोमियमचे प्रमाण 50.3 मिलिग्रॅम प्रतिलिटर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भारतीय मानकांतील 0.05 मिलिग्रॅम प्रतिलिटर या स्वीकार्य मर्यादेशी तुलना केल्यास हा आकडा तब्बल एक हजारपट अधिक ठरतो.
हेक्साव्हॅलेंट क्रोमियम हे गंभीर आरोग्यधोके निर्माण करू शकणारे विषारी रसायन आहे. त्याचा दीर्घकाळ संपर्क आल्यास कर्करोगासह इतर गंभीर परिणामांचा धोका असतो. त्यामुळे या नमुन्याचा अहवाल खरा असल्यास आणि त्यातील निष्कर्ष बाधित परिसरातील पाण्याला लागू होत असल्यास ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र एका नमुन्याच्या आधारे संपूर्ण परिसरातील प्रत्येक बोअरवेलची स्थिती, प्रदूषणाचा नेमका स्रोत किंवा नागरिकांना झालेल्या विशिष्ट आजारांचे कारण निश्चित करता येत नाही.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत अंबड एमआयडीसीतील ‘मे. आरती स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड‘ या उद्योगाच्या सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याचे वृत्त आहे. एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (ETP) आणि झीरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) यंत्रणा बंद असल्याचे, तसेच पिवळसर रासायनिक सांडपाणी उघडय़ा नाल्यात सोडले जात असल्याचे मंडळाच्या तपासणीच्या आधारे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी उद्योगाला बंद करण्यासह अन्य कारवाई का करू नये, अशा आशयाचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम केवळ तक्रार आल्यानंतर तपासणी करणे किंवा उद्योगांना नोटिसा बजावणे एवढेच नाही. औद्योगिक वसाहतींमधील प्रदूषणावर नियमित देखरेख ठेवणे, नियमांचे पालन होते की नाही हे तपासणे आणि संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना मिळाल्यास नागरिकांना वेळीच सावध करणे, हीदेखील त्याची जबाबदारी आहे. प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होईपर्यंत यंत्रणा निक्रिय राहिली असेल तर तिच्या कार्यपद्धतीचे परीक्षण झालेच पाहिजे.
बाधित परिसरातील काही नागरिकांना त्वचेवरील जखमा, सूज आणि इतर आरोग्यविषयक त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी आहेत. काही महिलांचे गर्भपात झाल्याचे दावेही पुढे आले आहेत. या तक्रारी संवेदनशीलतेने हाताळल्या पाहिजेत. मात्र विशिष्ट आजारांचा संबंध रासायनिक प्रदूषणाशी आहे किंवा गर्भपाताचे कारण हेच पाणी आहे, असे वैद्यकीय तपासणीशिवाय निश्चित मानणे योग्य ठरणार नाही. म्हणूनच आरोग्य विभागाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अंबड परिसरातील दूषित भूजलाचा नंदिनी नदीमार्गे गोदावरीत प्रवेश होतो का, झाल्यास किती प्रमाणात होतो आणि त्याचा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर काय परिणाम होतो, हे तातडीने तपासले पाहिजे. केवळ संशयाच्या आधारे गोदावरीतील संपूर्ण पाणी विषारी असल्याचा निष्कर्ष काढणे योग्य नाही; परंतु संभाव्य प्रदूषणाचा मार्ग मोकळा ठेवणेही अक्षम्य ठरेल.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या तपासणीचे महत्त्व अधिक वाढते. लाखो भाविक गोदावरीत स्नान करण्यासाठी येणार असतील तर नदीच्या पाण्याची गुणवत्ता ही केवळ पर्यावरण विभागाची फाइल राहू शकत नाही. ती सार्वजनिक आरोग्याची आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेची कसोटी ठरते. कुंभमेळ्यासाठी भव्य घाट बांधले, रस्ते रुंद केले आणि विद्युत रोषणाई केली तरी नदीत प्रदूषित पाणी मिसळत असेल तर त्या विकासाचे प्रयोजन काय?
गोदावरीचे पावित्र्य केवळ धार्मिक श्रद्धेतून जपले जाणार नाही. नदीत सांडपाणी सोडणाऱ्या घटकांवर नियंत्रण, औद्योगिक प्रदूषणाची नियमित तपासणी, सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया आणि नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेचे सार्वजनिक अहवाल या माध्यमांतूनच ते जपता येईल. श्रद्धा आणि विज्ञान यांच्यात संघर्ष नाही; उलट, श्रद्धेचा सन्मान करण्यासाठी विज्ञानाधारित पर्यावरण संरक्षण आवश्यक आहे. नाशिकला कुंभमेळा हवा आहे, पण त्याहून आधी नाशिककरांना सुरक्षित पाणी हवे आहे. गोदावरीचे पावित्र्य हवे आहे, पण त्यासाठी नदीचे प्रत्यक्ष प्रदूषण थांबवण्याची इच्छाशक्तीही हवी. उद्योग हवेत, पण नागरिकांच्या आरोग्याची किंमत मोजून नव्हे. कारण विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या पाण्यात विष मिसळत असेल तर तो विकास नसून समाजाच्या भविष्याशी केलेला घात आहे!
(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत)


























































