फिरस्ती – शौर्य, संस्कृतीचा साक्षीदार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रांजल वाघ, [email protected]

बेळगाव जिह्यातील सौंदत्ती तालुक्यात वसलेले ‘तल्लूर’ हे गाव आज भलेही शांत आणि निवांत दिसत असले तरीही या गावाच्या मध्यभागी दिमाखात उभा असलेला भुईकोटवजा वाडा आहे. हाच तल्लूर देसाई यांचा वाडा. हा अत्यंत देखणा वाडा आपल्याला थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवेकालीन मराठा इतिहासाच्या समृद्ध काळात घेऊन जातो. उत्तुंग दगडी बुरुज, भक्कम तटबंदी आणि अप्रतिम लाकडी कोरीवकामाचा हा अद्भूत नजराणा म्हणजे उत्तर कर्नाटकातील मराठा आणि स्थानिक कन्नड स्थापत्य शैलीच्या मिलाफाचा एक अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे.

मराठा साम्राज्याच्या अफाट विस्तारानंतर, विशेषत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘दक्षिण दिग्विजय’ मोहिमेनंतर आणि पुढे 18 व्या शतकात पेशव्यांच्या कारकीर्दीत, बेळगाव-धारवाड हा संपूर्ण सीमाभाग मराठा सत्तेच्या थेट प्रभावाखाली आला. या काळात स्थानिक पातळीवर महसूल वसुली, न्यायनिवाडा आणि लष्करी सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी ‘देसाई’ घराण्यांकडे सोपवण्यात आली होती. तल्लूरचे देसाई घराणे हे केवळ महसूल अधिकारी नव्हते, तर ते मराठा सत्तेचे विश्वासू सरदार आणि या भागाचे रक्षक होते. या वाडय़ाची बांधणी अत्यंत देखणी आहे. बाहेरून पाहिल्यास हा एखादा भक्कम आणि अजिंक्य ‘भुईकोट किल्ला’ वाटतो, तर आत प्रवेश केल्यावर मराठा पद्धतीची भव्य दिवाणखाने असलेली राजेशाही रचना पाहायला मिळते. सुमारे एक एकर परिसरात पसरलेल्या या वाडय़ाला महाकाय लाकडी प्रवेशद्वार, पहारेकऱयांसाठी देवडय़ा, शत्रूवर बंदुकीने मारा करण्यासाठी तटबंदीमध्ये ठेवलेल्या जंग्या आणि पाण्यासाठी दगडी पायविहीर आहे. वाडय़ातील सागवान लाकडी खांब आणि त्यावरील नक्षीकाम त्या काळातील वैभवशाली जीवनशैलीची स्पष्ट साक्ष देतात.

ब्रिटिशविरोधी संघर्षातही या वाडय़ाची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली. कित्तूरची राणी चेन्नम्मा, चाचडी आणि नरगुंदच्या मराठा सरदारांशी तल्लूरच्या देसाईंचे अत्यंत जवळचे आणि कौटुंबिक संबंध होते. इंग्रजांविरुद्धच्या संग्रामात या वाडय़ातून गुप्त मसलती, दारूगोळा आणि रसद पुरवठा केला जात असे. आजही तल्लूर देसाई घराण्याचे वंशज या ऐतिहासिक वास्तूत राहतात. मराठा साम्राज्याचा दक्षिणेतील हा बुलंद इतिहास जाणून घेण्यासाठी या ऐतिहासिक वाडय़ाला नक्की भेट द्यायला हवी!