
>> सुनील हिंगणे
भारतीय संस्कृती वीरतेची पूजक आहे. शौर्याची उपासक आहे. व्यक्ती आणि समाजातील तमाम घटकांमध्ये वीरता प्रकट होण्यासाठी दसऱयाचा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. या विजयाच्या ठायी लक्ष्मी वास करते. व्यक्ती, समाज, राष्ट्र या सर्वांच्या भूमिकांतून विजयश्री हे वैभव आहे आणि दसरा हा या विजयाच्या वैभवाचा व पराक्रमाचा सण आहे.
आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाची सांगता होते ती दसऱयाच्या दिवशी. संपूर्ण भारतभरात खासकरून दक्षिणेकडे हा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होतो. या दिवसाला अनेक पौराणिक तसेच नैसर्गिक ऋतुमानाचेही संदर्भ आहेत. हा उत्सव विजयासाठी प्रस्थान करण्याचा आहे. त्यामुळेच दसऱयाला विजयादशमी असेही म्हटले जाते. या दिवशी सीमोल्लंघन करण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. आज बदलत्या काळात सीमोल्लंघन म्हणजे आपल्या मनातील राग, लोभ, मत्सर, द्वेष, अंधश्रद्धा, सूड या वाईट भावना दूर करून मनाचं, विचारांचं एक प्रकारे सीमोल्लंघन करण्यासाठी या दिवसाचं महत्त्व आहे.
भारतीय संस्कृती वीरतेची पूजक आहे. शौर्याची उपासक आहे. व्यक्ती आणि समाजातील तमाम घटकांमध्ये वीरता प्रकट होण्यासाठी दसऱयाचा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. युद्ध अनिवार्य असेल तर शत्रूच्या आक्रमणाची वाट न बघता त्याच्यावर आक्रमण करून त्याचा पराभव करणे हीच कुशल राजनीती आहे. शत्रू आपल्या राज्यात घुसून लूट केल्यानंतर लढाई करण्याची तयारी करणारे आमचे पूर्वज नव्हते, तर शत्रूचा दुष्ट व्यवहार समजूनच त्याच्यावर आक्रमण करत असत. रोग आणि शत्रूला निर्माण झाल्याझाल्याच नष्ट करायला पाहिजे अन्यथा ते त्यांचे प्राबल्य वाढवते.
दसरा म्हणजे विजयाचे प्रतीक म्हणूनच या दिवसाला विजयादशमीदेखील म्हणतात. प्रभूरामचंद्रांच्या काळापासून दसरा हा दिवस विजयाचे प्रतीक बनला आहे. भगवान रामचंद्रांनी रावणाचा नाश याच दिवशी केला होता. म्हणून आजही या दिवशी प्रतीकात्मक रूपाने रावणदहन करतात. इतिहासात या दिवशी विजयप्रस्थान करण्याची अनेक उदाहरणे सापडतात.
ऋतुमानाचे संदर्भ
या उत्सावामागे काही नैसर्गिक ऋतुमानांचेही संदर्भ आहेत. दसऱयाच्या वेळी वर्षाऋतू येऊन गेलेला असतो. वरुण देवाच्या कृपेने या काळात अन्नधान्याची समृद्धी असते. त्यामुळे समाजमन आनंदाने भरलेले असते. नसानसांत उत्साहाचे कारंजे उडत असल्यामुळे विजयप्रस्थान करण्याचे त्याचे मन होणारच. या दिवसात पाऊस गेलेला असतो. चिखलाने माखलेले रस्ते सुकलेले असतात. हवामान अनुकूल असते. आकाश स्वच्छ असते. असे वातावरण विजयाला पूरक असते. शिवाय नऊ दिवस जगदंबेची उपासना करून प्रयत्न केलेली शक्तीदेखील शत्रूचा संहार करण्याची प्रेरणा देत असते. म्हणून या दिवशी विजयासाठी अर्थात चांगल्या कामाची सुरुवात करण्याची पद्धत आहे.
देवी जगदंबेने सतत नऊ दिवस युद्ध करून चंड-मुंड, रक्तबीज, महिषासुर आदी राक्षसांचा वध केला होता. तिच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही दसरा साजरा केला जातो. तसेच पांडवांनी अज्ञातवासातून बाहेर येऊन आपली लपविलेली शस्त्रे शमीच्या झाडावरून याच दिवशी बाहेर काढली होती. म्हणून या दिवशी सीमोल्लंघन करतात आणि येताना आपटय़ाची पाने सोन्याचे प्रतीक म्हणून एकमेकांना वाटतात. भारतीय संस्कृतीत प्रत्येक चेतन आणि अचेतन गोष्टीला सन्मान दिला जातो आणि त्यांचे पूजनही केले जाते. यामध्ये वृक्ष वनस्पतीही सामील आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला कडुलिंबाची पूजा केली जाते. वटसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा केली जाते. सोमवती अमावास्येला तुळशीची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यात येणाऱया कुशग्रहिणी अमावास्येला कुशाची पूजा केली जाते आणि कार्तिक मह़िन्यातील नवमीला आवळे नवमी म्हणून आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. त्या-त्या वनस्पतीचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व जाणून त्याचे पूजन केले जाते. जेणेकरून मानव या उपयुक्त वृक्षांचे संवर्धन करेल.
दसऱयाला आपटय़ाची पाने देण्यामागे विजय आणि उल्हासाची भावना असते. तसेच समृद्धीचीही कामनाही केली जाते. याच दिवशी काही भागांत अपराजिता (विष्णूकांता) या वनस्पतीचेही पूजन केले जाते. ही वनस्पती विष्णूला प्रिय आहे. या धार्मिक संदर्भाबरोबर तिचे काही वैद्यकीय गुणधर्म आहेत. ती अतिशय आरोग्यदायी आहे. कफविकारांवर या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो. विजया-दशमीला दुर्गा पूजन, अपराजिता पूजन, नवरात्रीचे पारणे इत्यादी विधी केले जातात.
श्रीमद्भगवतगीतेतील अठराव्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात ‘यत्र योगेश्वर कृष्णो’ या ओवीवर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे, ‘विजयो नामे अर्जुन विख्यातु। विजय स्वरुप श्रीकृष्णनाथु । श्रियेसी विजय निश्चितु। तेथेची असे?’ विजयश्री कुठे आहे, याचे विवेचन ज्ञानेश्वर माऊली या ओवीत करतात. भगवान श्रीकृष्ण हे विजयाचे मूर्तीमंत रूप आहे. तो ज्या पक्षात आहे तेथे विजयश्री खेचून आणणारच. विजयासाठी अर्जुन हे नाव प्रसिद्ध आहे, तर श्रीकृष्णनाथ ही विजयाची मूर्तीच आहे. या विजयाच्या ठायी लक्ष्मीसुद्धा वास करते आहे. व्यक्ती, समाज, राष्ट्र या सर्वांच्या भूमिकांतून विजयश्री हे वैभव आहे आणि दसरा हा या विजयाच्या वैभवाचा व पराक्रमाचा सण आहे.
पूर्वीच्या काळी सीमोलंघनाचा याचा अर्थ राज्याच्या सीमा ओलांडणे हा होता. आजच्या परिस्थितीत सीमोल्लंघनाचा नवा अर्थ जाणून घेतला पाहिजे यासाठी आपण आपल्या ध्येयाच्या कक्षा, आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारून पुढे गेलो, आपल्या मर्यादित संकुचित अवस्थेतचं सीमोल्लंघन करून व्यापकत्वाकडे गेलो, आपल्या दृष्टीचे उल्लंघन करून एका विशाल दृष्टीकडे गेलो, आपण आपले विचार कुटुंबापुरते मर्यादित न ठेवता समाजापर्यंत पोहोचलो तर ते खऱया अर्थाने सीमोल्लंघन ठरेल. आपल्यामधील संकृचित वृत्ती दूर करून विशालतेकडे झेपावणे असा याचा मथितार्थ आहे, पण सीमोल्लंघन म्हणजे मर्यादा ओलांडणे नसून कक्षा विस्तारणे आहे. आजच्या काळात अशा सीमोलंघनाची मोठी गरज आहे. समाजामधील भोगवृत्तीचा संहार करून त्यागवृत्तीकडे जाण्याचा हा सीमोलंघनाचा भाग आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे झेपावण्याचा, अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे आपण आपल्या जीवनाला उर्ध्व दिशेला परिवर्तीत करून जाण्यानेच खऱया अर्थाने हा सण आपण साजरा केला असे म्हणू शकतो.
(लेखक अध्यात्म अभ्यासक आहेत.)


























































