पॅरा भालाफेकपटू अनमोल वशिष्ठला डोपिंगचा डंख! तीन वर्षांची बंदी; ग्रांप्रीतील सर्व निकाल रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रीडाक्षेत्रात कामगिरीच्या जोरावर नाव कमावण्याची संधी असताना डोपिंगच्या प्रकरणाने हिंदुस्थानी पॅरा अॅथलीट अनमोल वशिष्ठला मोठा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने (आयपीसी) प्रतिबंधित अॅनाबॉलिक स्टेरॉईड सेवनाच्या प्रकरणात अनमोलवर तीन वर्षांची बंदी घातली आहे. त्याचबरोबर नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रांप्रीतील त्याचे सर्व निकाल रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत मिळवलेली पदके, गुण आणि पुरस्कारही त्याला गमवावे लागणार आहेत.

भालाफेकीदरम्यान घेतलेल्या नमुन्यात प्रतिबंधित पदार्थ

मार्चमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रांप्री स्पर्धेत पुरुषांच्या एफ-५५ भालाफेक प्रकारात सहभागी असताना ११ मार्चला अनमोलचा मूत्रनमुना घेण्यात आला होता. या नमुन्यात डिहायड्रोक्लोरोमिथाईल-टेस्टोस्टेरॉन या प्रतिबंधित पदार्थाचे चयापचयजन्य अवशेष आढळले. हा पदार्थ अॅनाबॉलिक अँड्रोजेनिक स्टेरॉईड प्रकारात मोडतो आणि जागतिक डोपिंगविरोधी संस्थेच्या २०२६ मधील प्रतिबंधित पदार्थांच्या यादीत त्याचा समावेश आहे.

तीन वर्षे स्पर्धापासून दूर या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान २४ एप्रिलला अनमोलला तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन मान्य केले व आयपीसीने केलेली शिक्षा स्वीकारली. त्याच्यावरील तीन वर्षांची बंदी २४ एप्रिल २०२६ पासून लागू झाली असून, ती २३ एप्रिल २०२९ पर्यंत राहणार आहे. या कालावधीत अनमोलला कोणत्याही स्पर्धेत किंवा अन्य क्रीडाविषयक उपक्रमात सहभागी होता येणार नाही. मात्र, अधिकृत डोपिंगविरोधी शिक्षण व पुनर्वसन कार्यक्रमांत तो सहभागी होऊ शकतो.

पदके आणि पुरस्कारही जाणार

आयपीसीने नवी दिल्लीतील ग्रांप्री स्पर्धेतील पुरुषांच्या एफ-५५ भालाफेक प्रकारासह अनमोलचे त्या स्पर्धेतील अन्य सर्व निकालही रद्द केले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत मिळवलेली पदके, गुण आणि पुरस्कार त्याला गमवावे लागणार आहेत. खेळाडूच्या नमुन्यात प्रतिबंधित पदार्थ आढळल्यास त्याची जबाबदारी संबंधित खेळाडूवरच असते, असे आयपीसीने स्पष्ट केले आहे. पदार्थाचा वापर जाणीवपूर्वक झाला असो किंवा अनवधानाने, नियमांनुसार खेळाडूला जबाबदार धरले जाऊ शकते. डोपिंगमुक्त क्रीडाक्षेत्रासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याच्या भूमिकेचाही आयपीसीने पुनरुच्चार केला आहे.