ड्रग्जच्या वाळवीने खाकीलाही पोखरले; भाईंदरच्या पोलिसाला एमडी विकताना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ड्रग्जच्या वाळवीने खाकी वर्दीलाही भयाणकरीत्या पोखरले असल्याचे दोन प्रकार वर्षभरात मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात घडले आहेत. पोलीस हवालदार प्रकाश पवार याला एमडी हे घातक ड्रग्ज विकताना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. या कारवाईत त्याचा साथीदार अखिलेश कुमार याच्यावरही झडप घालण्यात आली आहे. दरम्यान नयानगर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद केंद्रे याला आपल्या लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील रोहीणा गावात ड्रग्जची फॅक्टरी चालवल्याप्रकरणी 8 एप्रिल 2025 रोजी अटक झाली होती. त्यानंतर पवार हा एमडी विकताना पकडला गेल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांना पोलीस हवालदार प्रकाश पवार हा अमली पदार्थांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी कक्षाने सापळा रचून कारवाई केली. भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट परिसरात, गॅस गोडाऊनच्या गल्लीत हनुमान मंदिराजवळ पवारला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पवार यांच्यासह जोगेश्वरी येथे राहणाऱ्या अखिलेश कुमार यालाही अटक करण्यात आली

पाच दिवसांची पोलीस कोठडी

प्रकाश पवार आणि अखिलेश कुमार यांना मीरा-भाईंदर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर धायगुडे करीत आहेत. आता या तपासातून अमली पदार्थांच्या विक्रीमागील संपूर्ण साखळी उघड होते का, तसेच या व्यवहारात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कारवाईत पोलिसांनी पवारकडून 9.2 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत केले आहे. त्याची किंमत सुमारे 27 हजार रुपये आहे. याशिवाय एक बर्गमन दुचाकी, पवार यांच्या खिशातील 10 हजार रुपयांची रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 32 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

अमली पदार्थांची विक्री नेमकी कोणाला केली जात होती, या व्यवहारामागे आणखी कोणी सहभागी आहे का आणि या व्यवहाराचे जाळे किती मोठे आहे, याचा पोलीस कसून तपास करीत आहेत