माणगावात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीचा खून, आरोपीला फाशीसाठी महिलांचा एल्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकतर्फी प्रेमातून 16 वर्षीय मुलीचा धारदार शस्त्र्ााने गळा चिरून खून केल्याची संतापजनक घटना हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे शनिवारी (दि. 17) रात्री घडली. स्वरा नितीन उपाध्ये असे खून झालेल्या मुलीचे नाव असून, अरुण लगमावर (वय 37) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी महिलांनी एल्गार पुकारला असून, गावात तणावपूर्ण वातावरण आहे. गावात जलद कृती दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मृत स्वरा ही माणगावातील जैन मंदिर परिसरात राहत होती. आरोपी अरुण तिच्याकडे नेहमीच वाईट नजरेने पाहत होता. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. नवरात्रोत्सवामुळे वैष्णवी मंदिरात आरतीचा कार्यक्रम सुरू होता. आरती आटोपून स्वरा घरी परतत असताना, रस्त्यावर अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या आरोपी अरुण याने धारदार शस्त्र्ााने स्वरावर हल्ला केला. यात तिचा गळा कापून, हाता-पायांवर वार केले. यात स्वराचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपी पसार झाला.

घटनेची माहिती समजताच, ग्रामस्थ आणि महिला आक्रमक झाल्या. आरोपीला पकडून हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला गावकऱयांसमोर चौकात फाशी द्यावी, अशी मागणी संतप्त महिलांनी केली. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंतिम संस्कार करणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात स्वराच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ग्रामस्थांनी आरोपीच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून थांबवला. मयत स्वराला न्याय मिळवून देण्यासाठी सायंकाळी ग्रामस्थांकडून ‘कॅण्डल मार्च’ काढण्यात आला.