
सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत महायुतीला पराभवाचा जोरदार दणका बसला आहे. मतपत्रिकेवर झालेल्या या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’च्या 13 उमेदवारांनी विजय मिळवला. यामुळे ‘गोकुळ’वर महाविकास आघाडीची सत्ता आली असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी महायुतीचा ‘कंडका पाडला’ आहे.
गोकुळ दूध संघासाठी रविवारी मोठ्या चुरशीने 99.96 टक्के मतदान झाले. महायुतीच्या नेत्यांनी 25 विरुद्ध 0 अशी विरोधकांची सातत्याने अवहेलना केली. मात्र, महायुतीच्या ‘राजषी शाहू आघाडी’ला 12 जागांवर समाधान मानावे लागले. ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून ही निवडणूक लढवली गेली, ते वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांच्यासह तीन माजी अध्यक्षांना पराभवाला सामोरे जावे लागले.
निकाल फिरवण्यासाठी दबाव
सायंकाळी उशिरापर्यंत विजयी उमेदवारांच्या मतांची आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती. निकाल फिरवण्यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांकडून दबावतंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या उलटसुलट चर्चा सुरू होत्या. यामुळे आमदार सतेज पाटील उशिरापर्यंत मतदान केंद्रावर थांबले होते.
महायुतीमधील भांडणे आवडली नसावीत – मुश्रीफ
‘महायुतीमध्ये शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणे आणि त्यानंतर झालेली युती लोकांना आवडलेली नसावीत. बाद झालेली मतेही लक्षणीय आहेत. या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन! अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
नविद मुश्रीफ, सुजित मिणचेकर, शौमिका महाडिक यांचा दारुण पराभव
आज सकाळपासून रमणमळा परिसरात मतमोजणी सुरू होताच क्रॉस व्होटिंगचा धसका पहिल्या फेरीपासूनच दिसून आला. विश्वास आबा पाटील, अरुण डोंगळे, नविद मुश्रीफ हे माजी अध्यक्ष, तर संचालिका शौमिका महाडिक, माजी आमदार सुजित मिणचेकर अशा दिग्गजांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला.






























































