
अलनिनोच्या भयंकर संकटामुळे पावसाने ओढ दिल्याने ऑक्टोबर महिन्यातच नदी, नाले आटू लागले आहेत. उरण शहर, ग्रामीण परिसर आणि औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करणाऱ्या एकमेव रानसाई धरणाच्या पाण्याची पातळी रोज एक-एक इंचाने घटू लागली आहे. यामुळे उरणकरांना ऑक्टोबर महिन्यापासूनच गरजेतक्या पाण्यासाठी पुढील दहा महिने संघर्ष करावा लागणार आहे. पाणीपुरवठ्याचे इतर कोणतेही स्रोत उपलब्ध नसल्याने उरणकरांवर पाणी पाणी करण्याचे संकट ओढवण्याची भीती आहे.
उरण तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांहून अधिक आहे. त्यासाठी रानसाई धरणातून उरण शहराला ४.५० एमएलडी, ग्रामीण भागातील २० ग्रामपंचायतींना ६.५० एमएलडी तर औद्योगिक क्षेत्राला रोज २५ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. पूर्वेकडील दहा गावांतील ३५ हजार रहिवाशांना पुनाडे धरणातून तर चिरनेर, कोप्रोली, खोपटा आदी ग्रामपंचायतींना सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
अशुद्ध पाणी पिण्याची वेळ
उरण नगर परिषदेची पाणी बिलांची थकबाकी ४० कोटी रुपये इतकी आहे. त्यातच गेल्या १५-२० वर्षांपासून उरण नगर परिषदेने पाच जल कुंभांची सफाईच न केल्यामुळे लाखो नागरिकांवर अशुद्ध पाणी पिण्याची वेळ येऊन ठेपल्याचा आरोप नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी केला आहे. शहरात सुरू असलेल्या सुमारे २५ इमारतींच्या बांधकामासाठी प्रशासनाकडूनच बिनबोभाटपणे पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.





























































