
”कोणताही राजकीय पक्ष सत्ताधाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरतो तेव्हा परिवर्तन हाच त्यांचा मुख्य हेतू असतो. हो आम्हाला सत्ता बदलायची आहे आणि त्याच रेजिम चेंजचा एल्गार आज शिवतीर्थावरून दिला जाईल”, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंबईत पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
”हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलली ती खरी शिवसेना. दुसरे जे आहेत ते अमित शहांनी तयार केलेले गट आहेत. आता अमित शहांचेच दुकान बंद होणार आहे, त्यानंतर यांचे काय होणार? परंपरेप्राणे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना व जनतेला संबोधित करतील. महाराष्ट्र व देशात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. रेजिम चेंजचा विषय आहे. त्या रेजिम चेंजच्या संदर्भातील एल्गार आज शिवतीर्थावरून दिला जाईल. कोणताही राजकीय पक्ष सत्ताधाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याचा हेतूच परिवर्तन असतो. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे जे आकांडतांडव करत आहेत की यांना सत्ता बदलायची आहे. तर हो आम्हाला सत्ता बदलायची आहे. तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आला आहात का? तुम्हाला उठावंच लागेल. जनता रस्त्यावर उतरली आहे. ती मागे हटायला तयार नाही”, असे संजय राऊत म्हणाले.






























































