
मीरा-भाईंदर महापालिकेची सभा सुरू असताना भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकार आणि नागरिकांना मारहाण केल्याप्रकरणी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आज पालिका मुख्यालयावर धडक दिली. या पदाधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांनी भेट नाकारली. त्यामुळे मुख्यालयातील वातावरण तणावग्रस्त बनल्याने प्रशासनाने मुख्यालयाचे दोन्ही गेट बंद करून घेतले.
महापालिकेच्या महासभेचे थेट चित्रण करण्यावरून शुक्रवारी महासभेत वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकारांसह प्रेक्षक गॅलरीतील नागरिकांनाही मारहाण केली. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, युवक काँग्रेस तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज पालिका मुख्यालयात दाखखल झाले. आयुक्तांनी आंदोलकांना भेट देऊन घटनेबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र आयुक्तांनी त्यांना वेळ दिला नाही. त्यामुळे या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आयुक्त दालनाबाहेर घोषणाबाजी सुरू केली आणि परिसरातील तणाव वाढला.
आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने दोन्ही मुख्य प्रवेशद्वारे बंद केली. त्यामुळे विविध कामांसाठी महापालिकेत आलेल्या नागरिकांना प्रवेश मिळण्यात अडचणी आल्या. पत्रकारांनाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला.



























































