तळोजातील तीन दूध प्रकल्पांवर एफडीएचा बडगा, ऑन द स्पॉट परवाने निलंबित सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तळोजा एमआयडीसीतील तीन दूध प्रकल्पांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. उत्पादन प्रक्रियेत स्वच्छता आणि दूध साठवणुकीचे नियम पाळले जात नसल्याचे प्राथमिक तपासात आढळल्याने तिन्ही प्रकल्पांचे परवाने ऑन द स्पॉट निलंबित करण्यात आले. कारवाईत 1 हजार 494 लिटर दूध नष्ट करण्यात आले असून दहीही जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तोंडरे गावाजवळील बालाजी औद्योगिक पार्कमधील मातेश्वरी फूड्स, सावरिया मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट आणि रॉयल फूड्स या प्रकल्पांमध्ये दुधात भेसळ केली जात असल्याची माहिती एफडीएच्या पथकाला मिळाली. त्यानुसार एफडीएच्या पथकाने अचानक या तिन्ही प्रकल्पांवर छापा मारला.

एफडीएचे सहाय्यक आयुक्त अजित मैत्रे यांच्या नेतृत्वाखाली या तिन्ही प्रकल्पांतील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यात आली. एफडीएच्या या कारवाईदरम्यान मातेश्वरी फूड्समधील 598 लिटर आणि सावरिया मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टमधील 896 लिटर दूध नष्ट करण्यात आले. रॉयल फूड्समधील दही जप्त करण्यात आले.

याप्रकरणी बासदेव यादव, संजय यादव, नारायणलाल दांगी, आशा यादव, राधेश्याम यादव आणि संतोष ठाकूर या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.