
गुजरातच्या अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) मोठी कारवाई केली आहे. प्रवाशाच्या प्रोफायलिंगच्या आधारे दुबईहून आलेल्या एका प्रवाशाला रोखून त्याची तपासणी करण्यात आली असता, त्याच्या ट्रॉली बॅगेत सोन्याची पेस्ट लपवून ठेवल्याचे उघडकीस आले.
उत्तर प्रदेशमधील टांडा येथील रहिवासी असलेला 29 वर्षीय तरुण दुबईहून आला होता. त्याच्या ट्रॉली बॅगची कसून तपासणी केली असता, बॅगेच्या आतील बाजूस एक संशयास्पद कापडी पॅच लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या पॅचची सखोल तपासणी केली असता, त्याखाली सोन्याची पेस्ट थराच्या स्वरूपात लपवून ठेवल्याचे समोर आले.
अहमदाबाद विमानतळावर 20 लाखांहून अधिक रकमेचे सोने जप्त
https://t.co/dcUmaFl14p https://t.co/bgGxjI9Dhy— Saamana Online (@SaamanaOnline) October 20, 2026
ही सोन्याची पेस्ट बाहेर काढून ती वितळवण्यात आली असता, त्यातून 24 कॅरेटचे 133.450 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या सोन्याची बाजारातील किंमत 20 लाख 12 हजार 426 रुपये इतकी आहे. सीमाशुल्क विभागाने हे सोने आपल्या ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे.





























































