
‘आंदोलने आणि निदर्शने ही समाजातील समस्या आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे होतात. लोकशाहीत ते स्वाभाविक आहे. मात्र भावनांचा उद्रेक झाला तरी कृती कायदा आणि संविधानाच्या चौकटीतच असली पाहिजे. प्रशासन आणि राजकीय नेतृत्वानेही सभ्यतेच्या मर्यादा पाळून ही आंदोलने हाताळली पाहिजेत,’ असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मांडले.
नागपूरमधील रेशीमबाग येथे झालेल्या आरएसएसच्या विजयादशमी मेळाव्यात ते बोलत होते. देशात सुरू असलेल्या विविध आंदोलनांवर भागवत यांनी यावेळी भाष्य केले. ‘आंदोलन हे समस्यांवर उपाय शोधण्यासाठी असावे. त्यामागे समाज आणि देशाप्रती आपलेपणाची भावना असली पाहिजे. ते राजकारणाचे साधन बनल्यास त्यातून सामाजिक दरी वाढण्याची शक्यता असते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ‘मतभेदांचे रूपांतर मनभेदांत करणे, अन्यायग्रस्ततेची भावना तीव्र करणे आणि देशातील व्यवस्थांविषयी अविश्वास निर्माण करणे ही हिंदुस्थानला दुबळे करू इच्छिणाऱ्या शक्तींची कार्यपद्धती आहे, असा आरोप त्यांनी केला.
व्यसनाधीनतेविरोधात देशव्यापी मोहीम
नव्या पिढीतील व्यसनाधीनतेची समस्या गंभीर असून त्यास आळा घालण्यासाठी सरकार, प्रशासन आणि समाजाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. व्यसनांविरोधात देशव्यापी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक अभियान उभारण्यासाठी स्वयंसेवक देशभरात प्रयत्न करतील, असेही त्यांनी सांगितले.
देश तोडण्यासाठी असुरी शक्ती कार्यरत
भारताला तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील काही शक्तींना भारताला दाबून ठेवायचे आहे. जागतिक पटलावर भारताचा उदय होणे या शक्तींना परवडणारे नाही. दुर्दैवाने काही विवेकहीन आणि क्षुद्र स्वार्थ असलेले नेते स्वतःच्या फायद्यासाठी या शक्तींना सामील झाल्याचा आरोप यावेळी मोहन भागवत यांनी केला.
वंदे मातरम्ला विरोध नको!
वंदे मातरम्ला होणाऱ्या विरोधावर भागवत यांनी नाराजी व्यक्त केली. ‘बंगालच्या फाळणीच्या काळात राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून ‘वंदे मातरम्’चा उदय झाला. ‘वंदे मातरम्’ आजही राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देण्यास समर्थ आहे. हे आपले राष्ट्रगीत आहे. ते संपूर्ण म्हणायला कोणताही संकोच किंवा विरोध असता कामा नये, असे भागवत म्हणाले.
सरकार हा एकमेव उपाय नाही!
‘सध्या पाश्चात्त्य देशांतून एक लाट उसळली आहे. ही लाट सर्व प्रकारच्या व्यवस्था, संस्कृती आणि विचारधारांना उद्ध्वस्त करू इच्छित आहे. प्रगत देशही या लाटेशी लढत आहेत. फ्रान्स, अल्बानियामध्ये हेच सुरू आहे. सत्ता उलथवल्याने परिस्थिती बदलेल असे त्यांना वाटते, मात्र असे कधी होत नाही. समाजातील सर्व समस्यांचे निराकरण केवळ शासन करू शकते किंवा केवळ आंदोलनांतूनच उपाय निघू शकतात, असे नाही. समाजाचा सक्रिय सहभाग आणि परस्पर संवादातूनही प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे छोटय़ा घटनांवरून चिथावणी देऊन संघर्ष निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर राहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसने बनवला मोदींचा मुखवटा असलेला रावण
काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने दिल्ली येथे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, गौतम अदानी यांचे मुखवटे घातलेल्या रावणाचे दहन केले. यावेळी ‘वोट चोर गद्दी छोड…’, ‘आज का रावण नरेंद्र मोदी…’ अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या.



























































