
मुंबईत अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींमधील रहिवाशांचा मुद्दा शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत प्रभावीपणे मांडला. या इमारतींमधील रहिवाशांना ४० हजार रुपये घरभाडे द्या, राहत्या ठिकाणाजवळच त्यांच्यासाठी संक्रमण शिबिरे (ट्रान्झिट कॅम्प) उभारा आणि सर्व रहिवाशांची नीट नोंदणी केल्यानंतरच त्यांची घरे रिकामी करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबईतील ८२ उपकरप्राप्त इमारतींना म्हाडाने अतिधोकादायक म्हणून घोषित केले आहे. तेथील नागरिकांवर घरे रिकामी करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला.
कोणतीही ठोस हमी न देता सदरहू इमारतींमधील रहिवाशांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतरत्र राहण्यासाठी त्यांना महिन्याला २० हजार रुपये भाडे देऊ असे सांगितले जात आहे. परंतु सद्यस्थितीत त्यांना ४० हजार रुपये भाडे दिले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पुनर्विकास करण्यासाठी या रहिवाशांची पर्यायी व्यवस्था म्हणून नियमानुसार राहत्या ठिकाणाजवळच ट्रान्झिट कॅम्प उभारले गेले पाहिजेत. या रहिवाशांना तिथून हलवण्यापूर्वी त्यांची सविस्तर नोंदणी केली जावी, त्यांची भाडेकरू म्हणून ओळख निश्चित व्हावी आणि त्यानंतरच त्यांना तिथून हलवण्यात यावे, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी मांडली.





























































