निशाणा साधण्याची वेळ आलीय.. शिवसेना तो योग्य वेळी साधेल – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कल्याण / अंबरनाथ

निशाणा साधण्याची आता वेळ आली असून शिवसेना योग्य वेळी तो साधेल, अशा खास ‘ठाकरी’ शैलीत आज शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अचूक ‘नेम’बाजी केली. कल्याणमध्ये भव्य सिटी पार्कचे भूमिपूजन, तर अंबरनाथमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजचे लोकार्पण आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. निवडणुकीच्या वेळी नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता यानिमित्ताने झाली असून शिवसेनेने करून दाखवलं आहे. यापुढेही विकास हाच शिवसेनेचा ध्यास असल्याची ग्वाहीच आदित्य ठाकरे यांनी दिली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन विम्को नाका येथे नगर परिषदेच्या सवा एकर जागेवर 10, 25 व 50 मीटर क्षमतेचे जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज साकारले आहे. त्यासाठी अडीच कोटींचा खर्च आला असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचे शानदार उद्घाटन आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. रायफल हातात घेऊन त्यांनी स्वत: अचूक नेम धरला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ठाण्यात सध्या असलेल्या दहा मीटर रेंजची क्षमता पन्नासवर नेण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली, यावेळी सेल्फी पॉइंट, लायब्ररी, जीम, फिश मार्केटचेही उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आयुक्त गोविंद बोडके, उपनेते अल्ताफ शेख, महापौर विनिता राणे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, युवासेना सिनेट सदस्य व नगरसेवक निखिल वाळेकर, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, जिल्हा महिला संघटक विजया पोटे, स्थायी सभापती दीपेश म्हात्रे, सभागृह नेते श्रेयस समेळ, गटनेते दशरथ घाडीगावकर उपस्थित होते.

कल्याणमधील पहिलाच पर्यटन प्रकल्प
कल्याणमधील 30 एकर विस्तीर्ण जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सिटी पार्क’ तयार होत असून जिह्यातील हा पहिलाच पर्यटन प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. त्याचे भूमिपूजन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. उल्हास नदीच्या काठावर गौरीपाडा योगीधाम परिसरात सिटी पार्कसाठी जागा निश्चित केली आहे. स्मार्ट सिटी योजनेतून यासाठी 110 कोटींचा निधी मंजूर असून पहिल्या टप्प्यात संपूर्ण जागेस संरक्षक भिंत बांधणे, सपाटीकरण, वालधुनी नदीचा किनारा सुशोभित केला जाणार आहे.