
हिंजवडी आयटी पार्कमध्ये गर्दीच्या वेळी फेज 1 ते फेज 3 या अवघ्या दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल दीड तास लागतो. प्रचंड वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे आणि अपुऱ्या मूलभूत सुविधांमुळे हिंजवडीतील नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. रुग्णाला रुग्णालयात नेण्याची वेळ आली, तरी वाहतूक कोंडीमुळे वेळेत रुग्णालयात पोहोचता येईल की नाही, अशी दयनीय परिस्थिती असल्याची व्यथा आयटी कर्मचाऱ्यांनी आणि सोसायटीधारकांनी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडली.
या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 6 सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्याची घोषणा आयटी कर्मचाऱ्यांनी केली. या आंदोलनाला आदित्य ठाकरे यांनीही जाहीर पाठिंबा दिला.
चाकण औद्योगिक परिसरातील सुमारे 20 कंपन्यांनी खराब रस्ते, प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (दि. 15) स्वातंत्र्यदिनी चाकण MIDC परिसरातील रस्त्यांची पाहणी केली होती. त्यानंतर हिंजवडी आयटी पार्कमधील आयटी कर्मचाऱ्यांनी त्यांना संदेश पाठवून हिंजवडीतील समस्यांचीही पाहणी करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार, आदित्य ठाकरे यांनी अवघ्या दोन दिवसांत हिंजवडी आयटी पार्क परिसराला भेट दिली. मंगळवारी (दि. 18) दुपारी 12च्या सुमारास ते हिंजवडीतील लक्ष्मी चौकात दाखल झाले. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हिंजवडीतील मेट्रो स्थानकाची पाहणी करून कामाचा आढावाही त्यांनी घेतला. त्यानंतर शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर त्यांनी हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत ग्रामपंचायत सदस्यांशी परिसरातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर बर्ड व्हॅली हॉटेलमध्ये आयटी कर्मचारी आणि सोसायटीधारकांसोबत बैठक घेतली.
बैठकीत नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच आदित्य ठाकरे यांच्यासमोर वाचला. हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये सुमारे 4 ते 5 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यातच सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने दोन-दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली.
रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे फुटपाथ गायब झाले आहेत. त्यामुळे पायी प्रवास करतानाही जीव मुठीत धरून जावे लागते, असे एका सोसायटीधारकाने सांगितले. मागील वर्षभरात या परिसरात झालेल्या रस्ते अपघातांत 10 जणांचा मृत्यू झाल्याचेही नागरिकांनी आदित्य ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी हिंजवडी परिसराची पाहणी करून अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आता पुन्हा अतिक्रमणे वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. सोसायट्यांमधील कचरा व्यवस्थापनाचाही प्रश्न गंभीर झाला आहे. कचरा वेळेवर उचलला जात नाही तसेच त्याचे विलगीकरणही केले जात नाही. ग्रामपंचायतीची यंत्रणा या वाढत्या भारासमोर अपुरी पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मुळशी धरणातून पाणी आणण्याचा प्रश्नही रखडला
हिंजवडी परिसराला मुळशी धरणातून पाणीपुरवठा करण्याचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्नही कायम असल्याची व्यथा नागरिकांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडली.
स्वतंत्र महापालिकेची मागणी
हिंजवडी आयटी पार्क परिसरात हिंजवडी, माण आणि मारुंजी या तीन ग्रामपंचायती आहेत. याशिवाय परिसरात 12 ते 15 वाड्यांचाही समावेश आहे. वाढत्या लोकसंख्येला रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या सुविधा पुरवताना ग्रामपंचायतींवर मोठा ताण येत आहे.
त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी नागरिकांनी केली. ही मागणी यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही करण्यात आली होती. प्रत्येक कामासाठी MIDC, PMRDA आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जावे लागते. त्यामुळे या भागासाठी स्वतंत्र महापालिका निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.
‘आंदोलनासाठी परवानगीची गरज नसते’
प्रशासनाच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितल्यास नकार दिला जातो, अशी तक्रार काही आयटी कर्मचाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर, आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करावेच लागते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
“तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असा विश्वास त्यांनी आयटी कर्मचाऱ्यांना दिला. त्यानंतर आयटी कर्मचाऱ्यांनी 6 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली. तसेच आदित्य ठाकरे यांनीही आंदोलनात सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात आली. त्याला आदित्य ठाकरे यांनी संमती दर्शविली.
‘आणखी किती बळी घेणार?’
बालेवाडी-म्हाळुंगे परिसरात सोमवारी (दि. 17) सायंकाळी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वडील आणि बहिणीसोबत जात असलेल्या 11 वर्षीय मुलाचा आयशर टेम्पोच्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला “आणखी किती बळी घेणार?” असा सवाल केला.
परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांविरोधात काही दिवसांपूर्वीच नागरिकांनी आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतरही प्रशासनाला जाग येत नसल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
या बैठकीला शिवसेना सचिव सूरज चव्हाण, पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, महिला आघाडी संपर्क संघटिका स्वाती ढमाले, युवासेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अविनाश बलकवडे, तालुकाप्रमुख सचिन खैरे, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार, जिल्हाउपप्रमुख रोमी संधू यांच्यासह अनेक शिवसैनिक, आयटी फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने, सचिन यादव, उदयसिंह पाटील, पुष्कराज निंबाळकर, संजय आगरवाल, धनंजय जबडे, नेहा सूर्यवंशी, आनंद चौगुले, विजय पाटील, विक्रम माने, ज्ञानेंद्र हलसुरे, आशुतोष पांडे आदी सोसायटीधारक उपस्थित होते.
या बैठकीला शिवसेना सचिव सुरज चव्हाण, पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, महिला आघाडी संपर्क संघटिका स्वाती ढमाले, युवासेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अविनाश बलकवडे, तालुकाप्रमुख सचिन खैरे, पिंपरी – चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार, जिल्हाउपप्रमुख रोमी संधू, कैलास नेवासकर, नागेशप्पा साखरे, माऊली केमसे, अमोल जाधव, शिवाजी भिलारे, राजाभाऊ शेळके, माऊली सावंत, संदीपआमले, यशवंत गावरे, विनोद भेगडे, स्वप्नील गोडंबे, साहेबराव भेगडे, नवनाथ मालपुटे, शाम भेगडे, लाला साखरे, राम गावरे, राम गायकवाड, वैभव शितोळे, राजाभाऊ बुचडे, अनंत वाशिवले आदी शिवसैनिकांसह आयटी फोरम अध्यक्ष पवनजीत माने, सचिन यादव, उदयसिंह पाटील, पुष्कराज निंबाळकर, संजय आगरवाल, धनंजय जबडे, नेहा सुर्यवंशी, आनंद चौगुले, विजय पाटील, विक्रम माने, ज्ञानेंद्र हलसुरे, आशुतोष पांडे आदी सोसायटीधारक उपस्थित होते.

























































