भाजपचा जुमला हीच त्यांची गॅरंटी, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

आज देशात महागाई भयंकर वाढली आहे. देशातला जीडीपी म्हणजे गॅस, डीझेल आणि पेट्रोल आता सामान्यांना परवडेनासं झालं आहे. यांच्या किमती कमी होणार असा जुमला 2014साली भाजपने केला होता. आता दहा वर्षांनी त्याच जुमल्याला ते गॅरंटी म्हणत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.

उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि मिंधे गटावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले की, या देशात निवडणूक एका पक्षाबद्दल किंवा व्यक्तिबद्दल नाही, तर आता एका वृत्तीबद्दल झालेली आहे. या वृत्तीचं नाव भाजप असं आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपने हुकूमशाहीची सत्ता गाजवली. 2014 आणि 19ला शिवसेना म्हणून त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी त्यांचा प्रत्येक शब्द, वचन लोकांपर्यंत पोहोचवलं होतं. मग 2014 आणि 2019मध्ये त्यांनी बहुमत मिळालं. 2014ला त्यांना 282 जागा तर 2019ला 303 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही वेळा शिवसेना त्यांच्यासोबत होती. त्यामुळे भाजपने निवडणूक जास्त खेचण्याचा प्रयत्न केला नाही. 2014 साली आमचं तन मन धन लावून त्यावेळी भाजपसाठी प्रचार केला आणि दिल्लीत सत्ता काबीज केल्यानंतर 2014ला त्यांनी युती आपल्याबरोबर युती तोडली. तेव्हा त्यांनी प्रथम विश्वासघात केला. मग फोन आला की उद्धवजी आता युती संभव नाही. तेव्हा काय नक्की बदलावं हे त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारलं होतं. त्यावेळी तुमची आम्हाला गरज नाही, असं आम्हाला सर्वे सांगतोय. मुळात हाच प्रश्न आहे की, त्यावेळी हिंदू नव्हतो का? त्यावेळी आम्ही तुमची साथ दिली नाही का? जेव्हा तुम्ही 2014ला खोटं बोलत फिरत होतात, तेव्हा काय आम्ही सोबत नव्हतो. त्यानंतर 2019 साली निवडणुकीपूर्वी भाजपचे काही नेते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत येऊन शब्द देऊन गेले होते. तो त्यांनी ऑक्टोबर 2019मध्ये मोडला. आता कालपरवाकडे उद्धव ठाकरेंची मुलाखत आली पेपरमध्ये, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांची खोली जिला आम्ही मंदिर मानतो, त्या खोलीचा उल्लेख कुठलीतरी खोली असा केला. असा अपमान खपवून घेणार नाही आणि जो करेल त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ शिवसैनिकांनी घेतली आहे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

दहा वर्षांतील भाजपच्या घसरत्या राजकारणावरही त्यांनी टीका केली. ‘गेल्या दहा वर्षांत जे राजकारण इतकं गलिच्छ झालं आहे, की इतकी खालावलेली पातळी मी पाहिलेली नव्हती. आधी अनेक लोकं पक्ष बदलायचे, तिकीटं मिळायची, युती जुळायची-तुटायची. पण गेल्या अडीच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी जे राजकारण केलं ते सारा देश बघत आहे. शिवसेना फोडली. राष्ट्रवादी फोडली, अनेकांकडून गद्दारी करून घेतली. स्वतःच्या परिवाराविरुद्ध लढणं कठीण असतं पण सुप्रिया सुळे ती लढाई लढत आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाविरुद्ध कोणतेही वाईट शब्द काढलेले नाहीत, हा सुसंस्कृतपणा आहे. हातात ढाल नसताना आम्हा दोघांचेही वडील लढताहेत. त्यांच्या पाठीवर वार करण्यात आले आहेत. ज्यांना त्यांनी सगळं काही दिलं, त्यांनीच पाठीवर वार केले आहेत.’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपच्या जुमलेबाजीवर घणाघात करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या देशात महागाई भयंकर वाढली आहे. देशातला जीडीपी म्हणजे गॅस, डीझेल आणि पेट्रोल आता सामान्यांना परवडणार नाही इतकं महागलं आहे. यांच्या किमती कमी होतील असं भाजप सरकारने सांगितलं होतं. पण, आता त्याच्या किमती आरपार गेल्या आहेत. 2014ला काळापैसा परत येणार होता, 15 लाख खात्यात येणार होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं. प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळणार होतं. भाजपचे जे जुमले होते, त्यांना आता गॅरंटी म्हटलं जात आहे. गेल्या दहा वर्षांत गॅरंट्या यशस्वी ठरल्या असत्या तर त्यांच्या मोठ्या नेत्यांना हिंदू-मुस्लीम वाद लावण्याची गरज पडली नसती, असं टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी यावेळी सोडलं.