
मुंबई, नागपूर महामार्गावर वैजापूर तालुक्यातील शिवराई शिवारात वीरभद्र मंदिराजवळ सोमवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास वऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सहा जखमींची प्रकृती गंभीर आहे.
दोन ‘आयशर’ टेम्पोची समोरासमोर धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात साखरझोपेत असलेल्या पाच वऱ्हाडींवर काळाने घाला घातला. या अपघातात नवरदेवाचे वडील पंडित शहाजी मोरे (45), भाची प्रज्ञा गौतम गायकवाड (17), आत्या कविता आबासाहेब वडमारे (45), मावशी ललिता पुंडलिक पवार (48) व मित्राचा मुलगा मोनू दीपक वाहुळे (8, रा. गौतमनगर, अंबड नाशिक) या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
पळशी (ता. परतूर, जि. जालना) येथील पंडित शहाजी मोरे यांचा मुलगा वैभव याचे लग्न हातवण, ता. मंठा, जि. जालना येथील गौतम नामदेव खरात यांची मुलगी कांचन हिच्याशी 30 जानेवारी रोजी होते. पळशी येथील मूळचे रहिवासी असलेले मोरे कुटुंबीय काही दिवसांपासून नाशिक येथे रहायला गेले आहेत. लग्नाला जाण्यासाठी त्यांनी नाशिक येथील भारत चव्हाण यांचा आयशर टेम्पो भाड्याने घेतला होता. त्याच्यावर राहुल अनिल रोकडे हा चालक होता. लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मोरे कुटुंबीय काही नातेवाईक व मित्रमंडळीस अशा 35 जणांना घेऊन 29 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता लग्नस्थळी आले होते.
30 जानेवारीला लग्न सोहळा दुपारी 2 वाजता पार पडला. त्यानंतर लग्नात आलेली भांडी टेम्पोत भरून सायंकाळी सात वाजता हातवण येथून सर्व वऱ्हाडी नाशिकला जाण्यासाठी निघाले होते. वर-वधू दुसऱ्या वाहनाने नाशिकला रवाना झाले होते. मुंबई-नागपूर महामार्गाने येत असताना वैजापूर तालुक्यातील शिवराई शिवारात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने वऱ्हाडींच्या आयशरला जोराची धडक दिली. त्यामुळे टेम्पो रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. नागारिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणी अविनाश पंडित मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेम्पोचालकाविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातातील जखमींची नावे
अविनाश पंडित मोरे (25), मारोती लक्ष्मण काटे (24), संपत किशन पाईकराव (44), नीलेश संपत पाईकराव (13), ज्ञानेश्वर मगर (40), चालक राहुल अनिल रोकडे (32), शोभा भीमराव वाहोळे (40), अॅलेक्स संजय लाखे (20), प्रणाली सुनील वडमारे (12), राहुल नामदेव लहाडे (32), पल्लवी राजू मोरे (16), संतोष गौतम गायकवाड (20), नंदा पंडित मोरे (25), दादाराव बबन निसर्गंध (32), कल्पना राजू मोरे (35), संजय लक्ष्मण खरात (40), पंडित शहाजी मोरे (45), राजू दादाराव मोरे (45), समाधान आबासाहेब वडमारे (18), किशोर नाथा भदर्गे (35), पंचशीला गौतम गायकवाड (22), स्वप्निल राजू मोरे (13), राज सुंदर खरात (29), सुंदर लक्ष्मण खरात (49), अलकेश संजय खरात (20, सर्व जखमी हे गौतमनगर अंबड येथील रहिवासी आहेत.
































































