ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही तसेच सर्वपक्षीय बैठकीनंतर सगेसोयर्यांचा अध्यादेश काढला जाईल या दोन मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. उर्वरित मागण्यांवरही सकारात्मक विचार सुरू असल्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे, त्यामुळे दहा दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काल झालेल्या चर्चेनंतर आज मंत्री छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, उदय सामंत, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे यांचे शिष्टमंडळ दुपारी वडीगोद्रीत दाखल झाले. सरकारच्या वतीने त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी छगन भुजबळ यांनी सरकारने उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात काढलेले पत्रक वाचून दाखवले आणि प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची विनंती मान्य करून प्रा. हाके यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. मराठा आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही तसेच सर्वपक्षीय बैठकीनंतर सगेसोयर्यांसंदर्भातील अध्यादेश काढण्यात येईल, या दोन मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. उर्वरित मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे आम्ही दहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित करत आहोत, असे प्रा. हाके म्हणाले.
उपोषण स्थगित, आंदोलन सुरूच
सरकारने आमच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बोगस कुणबी नोंदी शोधल्या जाणार असून, त्या देणारांवर आणि घेणारांवर कारवाईबाबत सरकारने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आम्ही उपोषण स्थगित केले आहे, परंतु ओबीसी आरक्षण बचावसाठी सुरू असलेले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी स्पष्ट केले.
भुजबळांची फटकेबाजी
उपोषणस्थळी बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. आता त्यांची दादागिरी चालणार नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षण वाचवण्यासाठी सर्व ओबीसी समाजांना एकत्र यावेच लागेल, असेही ते म्हणाले. आरक्षणासंबंधी निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पाडले. ठरवून ओबीसी नेत्यांना बदनाम करण्याची मोहीम राबवण्यात आली, असा आरोपही भुजबळ यांनी केला. आम्ही शांत आहोत म्हणजे कमकुवत आहोत, असे समजण्याचे कारण नाही, असा इशारा देतानाच त्यांनी माझ्यावर टीका करण्याऐवजी प्रा. हाकेंशी आरक्षणावर चर्चा करावी, असा टोलाही लगावला. आम्ही कुणाला धमक्या देत नाही आणि कुणाला घाबरतही नाही, असेही ते म्हणाले.
प्रा. लक्ष्मण हाके यांच्या मागण्या
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी.
बोगस कुणबी नोंदींची त्वरित दखल घेऊन त्या रद्द करण्यात याव्यात.
ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी.
प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह उभारण्यात यावे.
ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.