दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा गजबजल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीच्या दोन आठवडय़ांच्या सुट्टीनंतर मुंबई आणि परिसरातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आज पुन्हा गजबजली.
मुंबई आणि परिसरातील इंग्रजी आणि केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांची दिवाळी सुट्टी मागील आठवडय़ातच संपली आहे. मात्र, शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शिक्षण मंडळाच्या अख्त्यारित येणाऱया तसेच महापालिका शिक्षण विभागाच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची दिवाळी सुट्टी आज संपल्यानंतर त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. यात मुंबईतील हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू आदी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्यातील सर्व शाळांमध्ये दुसऱया सत्राला सुरुवात होते, त्यानुसार या सत्रातील अभ्यासक्रम पुस्तके याचे नियोजन शिक्षकांकडून यापूर्वीच करण्यात आले असल्याने त्याचीही सुरुवात आजपासून करण्यात आली असल्याची माहिती महापालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. मुंबईतील शाळांतील मुलांच्या आरोग्यासंदर्भात अनेक उपक्रम सुरू आहेत. शिवाय गुणवत्तेसोबत शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असून दिवाळीनंतरच्या या दुसऱया सत्रातही अनेक उपक्रम राबविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले