
उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका आठ महिन्यांच्या गरोदर महिलेला ट्रकने चिरडले. या अपघातात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला मात्र ट्रकने चिरडल्याने त्या महिलेचे पोट फुटले व बाळ बाहेर पडले. त्या महिलेच्या पतीने त्या दोघांना तत्काळ रुग्णालयात नेले. त्या महिलेला मुलगी झाली असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कामिनी असे त्या महिलेचे नाव असून ती तिचा पती रामूसोबत बाईकवरून तिच्या माहेरी जात होती. कामिनीला आठवा महिना सुरू असल्याने रामू तिला माहेरी बाळंतपणासाठी घेऊन जात होता. ते दोघे बाईकवरून जात असताना अचानक रामूचा बाईकवरचा ताबा सुटला व दोघेही खाली पडले. त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने कामिनीला चिरडले. गरोदर कामिनीच्या अंगावरून ट्रक गेल्याने तिच्या गर्भातील बाळ थेट बाहेर आले. ते दृश्य पाहून तेथे उपस्थितांचा थरकाप उडाला.
रामूने काही लोकांच्या मदतीने पत्नीला व बाळाला रुग्णालयात दाखल केले. कामिनीचा मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर रस्त्यावर जन्माला आलेले तिचे बाळ मात्र सुदृढ जन्माला आले आहे.




























































