नगरचे 10 हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार, ‘आधार’ प्रमाणीकरणाला प्रतिसाद नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या ‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती’पासून जिल्ह्यातील नऊ हजार 978 शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. सहकार विभागाद्वारे व जिल्हा सहकारी बँकेसह अन्य राष्ट्रीयीकृत बँकांद्वारेही वारंवार आवाहन करूनही या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड प्रमाणीकरण करण्याबाबत फारसा प्रतिसाद दिलेला नाही. या आधार प्रमाणीकरणाला येत्या सोमवारपर्यंतची (15नोव्हेंबर) मुदत देण्यात आली आहे. या काळात हे प्रमाणीकरण होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार राज्याच्या सत्तेवर आल्यावर त्यांनी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज या योजनेत माफ केले गेले होते. या ‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’च्या अंमलबजावणीत नगर जिल्ह्याचा राज्यात पहिला क्रमांक आहे. नगर जिल्ह्यातील आतापर्यंत दोन लाख 86 हजार 861 शेतकऱ्यांना एक हजार 742 रुपये कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला आहे. राज्यात कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकरीसंख्येमध्ये आणि कर्जमुक्तीच्या रकमेमध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नगर जिल्ह्याचे काम राज्यात आघाडीवर आहे. मात्र, आता राज्य शासनाने ‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत पात्र पाच हजार 300 शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर केलेली आहे. या शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा नगर जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी केले आहे.

अनेकांचे प्रमाणीकरण बाकी

या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या पाच हजार 300 शेतकऱ्यांची यादी राज्य शासनाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. नव्याने यादीत आलेले हे शेतकरी, तसेच पूर्वीच्या यादीत शिल्लक राहिलेले चार हजार 678 असे मिळून नऊ हजार 978 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण केले नाही, तर संबंधित शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे तातडीने संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याशी त्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.