
सामना ऑनलाईन । अबुधाबी
मुंबईत जन्मलेल्या 30 वर्षीय एजाज पटेल या डावखुऱया फिरकी गोलंदाजामुळे न्यूझीलंडने सोमवारी पाकिस्तानला चार धावांनी धूळ चारली आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 176 धावांचा पाठलाग करणाऱया पाकिस्तानचा डाव 171 धावांमध्येच गडगडला. पहिल्या डावात दोन फलंदाज बाद करणाऱया एजाज पटेलने दुसऱया डावात 59 धावा देत पाच फलंदाजांना बाद करीत पदार्पणाच्या कसोटीत सामनावीराचा मान संपादन केला.
इश सोढी व एजाज पटेल या फिरकी जोडगोळीसमोर पाकिस्तानची अवस्था बिनबाद 40 या धावसंख्येवरून तीन बाद 48 अशी झाली. अझर अली व असाद शफीक या जोडीने 82 धावांची भागीदारी केली. पण नील वॅगनरच्या गोलंदाजीवर असाद शफीक 45 धावांवर बाद झाला आणि तिथूनच सामन्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर अझर अली एकटा लढला त्याने 65 धावांची खेळीही साकारली. अखेर 41 धावांत पाकिस्तानचा खेळ खल्लास झाला.
हिंदुस्थानी वंशाचा पाचवा खेळाडू
एजाज पटेल हा न्यूझीलंडसाठी खेळणारा हिंदुस्थानी वंशाचा पाचवा खेळाडू ठरलाय. याआधी टेड बेडकॉक, टॉम पुना, इश सोढी व जीत रवाल यांनी न्यूझीलंडसाठी खेळण्याचा मान संपादन केलाय. एजाज पटेलचे कुटुंब 1996 साली मुंबईतून न्यूझीलंडमध्ये स्थलांतरीत झाले होते.




























































