भाजप आणि संघ परिवाराच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा, अखिलेश यादव यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप आणि त्यांच्या संलग्न संघटनांवर निशाणा साधत विविध आर्थिक, मालमत्ता आणि संघटनात्मक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत या प्रकरणांचा कायदेशीर आणि आर्थिक आढावा घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

अखिलेश यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, परवानाधारक शस्त्रांप्रमाणेच काही ‘अदृश्य शस्त्रे’ देखील असतात, जी देश, समाज आणि सामाजिक सलोखा यांच्यावर गुप्तपणे घातक परिणाम करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी वकिलांच्या मतांचा हवाला देत काही मुद्द्यांवर चौकशी करण्याची मागणी केली.

त्यांनी भाजप नेते, पदाधिकारी आणि संबंधित व्यक्तींच्या घरे, दुकाने, कार्यालये आणि इतर प्रतिष्ठानांच्या कागदपत्रांची व नकाशांची वैधता तपासावी, अशी मागणी केली. तसेच विविध बांधकामे, कार्यक्रम आणि आपत्ती निवारणाच्या नावाखाली गोळा करण्यात आलेल्या देणग्या व निधीचा हिशेब मागवून त्याचे ऑडिट करावे, असेही त्यांनी म्हटले.

यादव यांनी काही व्यक्ती किंवा संस्थांकडे असलेल्या अनोंदणीकृत मालमत्तांबाबत प्रश्न उपस्थित करत अशा जमिनी आणि बांधकामे कोणाच्या नावावर आहेत, तसेच ती बेनामी मालमत्ता म्हणून का गणली जाऊ नयेत, याबाबत कायदेशीर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

याशिवाय, भाजपशी संबंधित काही संघटनांच्या इमारतींना ‘कार्यालय’ म्हणायचे की ‘अड्डा’, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. अशा संस्थांचा आर्थिक खर्च कोण उचलतो, निधीचे स्रोत कोणते आहेत आणि त्याचा तपशील सार्वजनिक करावा, असेही त्यांनी नमूद केले.

अखिलेश यादव यांनी संबंधित संघटनांच्या परदेश दौऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच इंग्रजांच्या काळापासून या संघटनांचे संबंध कोणाशी होते, त्यांचा इतिहास काय आहे आणि सामाजिक सलोखा बिघडवण्यात त्यांची भूमिका का असल्याचा आरोप केला जातो, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.