अलिबागची वाडगाव पंचायत राज्यात नंबर वन, आदिशक्ती अभियानात प्रथम क्रमांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायत आदिशक्ती अभियान स्पर्धेत राज्यात नंबर वन ठरली आहे. महिला सक्षमीकरण, लोकसहभागातून विकासकामे राबवणे तसेच सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासारखे अनेक उपक्रम वाडगाव ग्रामपंचायतीने यशस्वीपणे राबवले. या उपक्रमांची दखल घेण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

महिला व बालविकास विभागाने जिल्हा आणि तालुकास्तरीय आदिशक्ती पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेत कोकण विभागात वाडगाव ग्रामपंचायतीने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ग्रामपंचायतीला दुसरा क्रमांक तर मिरज तालुक्यातील कवठेपिराण ग्रामपंचायतीने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

वाडगाव ग्रामपंचायतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले. महिला बचत गटांना बळकटी, स्वयंपूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांच्या आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, ग्रामस्वच्छता, लोकसहभागातून विकासकामे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे ग्रामपंचायतीने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे.

वेगळे उपक्रम राबवण्याचा निर्धार

राज्यस्तरीय बहुमान मिळाल्याने वाडगाव ग्रामपंचायतीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे राज्यातील इतर ग्रामपंचायतींसमोर वाडगावने ग्रामविकासाचा आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान भविष्यातही यापेक्षा वेगळे उपक्रम राबवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.