Lok Sabha election 2024 : संविधान वाचवण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले, भाजपचे पानिपत करण्याचा निर्धार

भाजपच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात आणि संविधान बदलण्यास निघालेले पंतप्रधान मोदी यांच्या हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाहीवादी, आंबेडकरवादी संघटनांच्या नेत्यांनी आज ‘संविधान वाचवा’ अशी समाजाला साद दिली. ‘संविधान बचाव’ अशी भूमिका घेत सर्वपक्षीय विरोधकांनी एकीची मोट बांधली.

मुंबईतल्या विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शिवसेना भवनमध्ये ‘संविधान वाचवा’ सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते व लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले की, संविधान बचाव ही भूमिका आपण घेतली आहे. आपले विचार जुळले म्हणून आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. पूर्वी जे लोक एकमेकांचे चेहरे पाहायचे नाहीत ते आता एकत्र आले आहेत. आता आपण एकमेकांना सहकार्य करून पुढे जाऊ, असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले.

देशाचे संविधान वाचवायचे आहे. म्हणून आपण एकत्र आलो आहोत. भाजपने मागील अधिवेशनात दोन विधेयके मंजूर केली, पण ती 156 खासदारांना निलंबित करून मंजूर केली तो संविधनावर हल्ला होता आणि ते आपण ओळखले पाहिजे, असे आवाहन दक्षिण मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी केले.

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांनी यावेळी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार व्यवस्थित चालत होते. पण काही लोकांनी गद्दारी केली. भाजप संविधान बदलायला निघाले आहे, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान असे बदलता येत नाही.

शिवसेना भवनात विरोधकांचे समन्वय व्यासपीठ

इंडिया-महाविकास आघाडी व सामाजिक संघटना समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी शिवसेना भवन येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर, विद्या चव्हाण, अर्जुन डांगळे, सुधाकर सुराडकर, लोकसभेचे महाआघाडीचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत, दक्षिण-मध्यचे अनिल देसाई, उत्तर-पूर्व मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील, उत्तर-पश्चिमचे अमोल कीर्तिकर, श्याम गायकवाड, विलास लांडे, कॉम्रेड अशोक ढवळे, संजय उपाध्याय, विश्वास उटगी आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते.