भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होणार! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विश्वास

लोकसभा निवडणूक ही देशाची असते. इंदिरा गांधींसह अनेक पंतप्रधान होऊन गेले. मात्र, त्यांनी महाराष्ट्रात निवडणुकीसाठी केवळ एक ते दोन सभा घेतल्याचे दिसून येते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांना घाबरले असून, त्यांना सगळीकडे ठाकरे दिसतात. म्हणून मोदींना छोटय़ा छोटय़ा गावांसह महाराष्ट्रात तब्बल 20 सभा घ्याव्या लागल्या. पंतप्रधानांनी कितीही सभा घेतल्या तरी शिवसेनेचे मशाल चिन्ह हे विशाल विजय घेऊन जाणार असून, महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होईल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ सोनई येथे झालेल्या मेळाव्यात अंबादास दानवे बोलत होते. यावेळी आमदार नितीन देशमुख, शिवसेना संपर्पप्रमुख आमदार सुनील शिंदे, आमदार शंकरराव गडाख, अंकित प्रभू, शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उदयन गडाख, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके आदी उपस्थित होते.

देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असे चित्र निर्माण झाले आहे. महागाई, बेरोजगारी, उद्योगधंद्यांबाबत यांची पूर्वीची भाषणे बघा. आज त्याच्यावर बोलायला तयार नाही. भाजपने पिकाला भाववाढ केली नाही, कांदा निर्यातबंदी केली, त्यानंतर फक्त गुजरातची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे गोंधळ उडाल्यानंतर कांदा निर्यातीला परवानगी दिली. याचा शेतकऱयांना काहीच फायदा होणार नाही, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

भाजप 200 पार पण होत नाही
देशात उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भाजपला फटका बसणार आहे. येथे त्यांचे कमी खासदार निवडून येणार असले तरी भाजप चारशे पारचा नारा देत आहे. आम्ही छातीठोकपणे सांगतो की भाजप 200 पार होत नाही, असे दानवे म्हणाले.

‘रामा’च्या विरोधात नाही हरामाच्या विरोधात
प्रभू श्रीराम हे एकटय़ा भाजपचे नाहीत. आम्ही रामाच्या विरोधात नसून, हरामाच्या विरोधात आहे. भाजपने लोकसभा निवडणूक मुद्दय़ावरून गुद्दय़ावर नेण्यासाठी अनेक गोष्टी उकरून काढल्या. यांना रामाचं आणि विकासाचं काही घेणे-देणे नाही, देश हुपूमशाहीकडे नेण्याचे यांचे षडयंत्र आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.