
सामना प्रतिनिधी । मुंबई
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज माघार घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही तर मात्र पुन्हा आक्रमक होईन, असा इशारा गोटे यांनी यावेळी दिला.
धुळ्यातील भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करीत धुळ्यात एका कार्यक्रमात पक्षाच्या विरोधात उघड भूमिका घेत राजीनामा देण्याची घोषणा केली होती. तसेच धुळ्यात महापौरपदाची निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोटेंकडे सर्वांचे लक्ष लागले होते पण पत्रकारांशी बोलताना गोटे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर राजीनामा देण्याचा निर्णय बदलला आहे. गुन्हेगारांना भाजपमध्ये प्रवेश देणार नाही व धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका माझ्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील असे आश्वासन मला दिल्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पण यामध्ये काही दगाफटका झाल्यास पुन्हा आक्रमक होईन असा इशारा देण्यास गोटे यावेळी विसरले नाहीत.




























































